
सामना ऑनलाईन । मुंबई
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाहीत असे म्हणतात. नुकतेच आगामी ‘नशीबवान’ सिनेमाच्या टीमनेदेखील गणेशगल्लीतला ‘मुंबईचा राजा’ आणि ‘लालबागचा राजा’ या दोन मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन आपल्या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. ‘नशीबवान’मध्ये मुख्य भूमिका बजावणारा भाऊ कदमदेखील यावेळी हजर होता. बाप्पाकडे ‘नशीबवान’ सिनेमाच्या यशाचे साकडे घालण्यासाठी सिनेमाची टीम पोहचली. यावेळी कलाकार जयवंत वाडकर यांनीदेखील प्रमुख उपस्थिती लावली होती.
उदय प्रकाशलिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊ कदमच्या अभिनयाची एक वेगळीच छटा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमात भाऊसोबत मिताली जगताप-वराडकर आणि नेहा जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केले आहे.