बस तिकिटावरून मृताची ओळख पटली

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। नाशिक

मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ शिवारात अज्ञात मृत व्यक्तीच्या खिशात मिळालेल्या बस तिकिटामुळे त्याची ओळख पटविण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. याप्रकरणी मृताच्या पत्नीसह एकाला ताब्यात घेण्यात आले असून, अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

मागील आठवडय़ात 4 मार्चला मालेगाव-धुळे रस्त्यावरील चिखलओहोळ शिवारात एका चाळीसवर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला होता. चेहऱयावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविण्याचा प्रयत्न झाल्याने त्याची ओळख पटू शकली नव्हती. मृताच्या खिशात मिळालेल्या दोंडाईचा-धुळे बस तिकीटाच्या सहाय्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी तपास सुरू केला. मृत व्यक्ती धुळे जिह्यातील शनीनगर येथील महेंद्र काशीनाथ परदेशी असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीसाठी त्याची पत्नी रुपाली हिस ताब्यात घेतले असता तिने आपले कैलास वाघ याच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. त्या कारणावरून महेंद्र मारहाण करीत असल्याने तिने 2 मार्चला कैलासला घरी बोलावले. कैलास व महेंद्र यांच्यात झालेल्या झटापटीत कैलासने महेंद्रचे हातपाय सुताच्या दोरीने बांधून लोखंडी हातोडीने जबर मारहाण केल्याने महेंद्रचा मृत्यू झाल्याची कबुली तिने दिली. कैलासने मित्र धनेश ऊर्फ बबलू महादेव चव्हाण व इतर दोन साथीदारांच्या मदतीने महेंद्रचा मृतदेह चिखलओहोळ शिवारात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी रुपाली व धनेश ऊर्फ बबलू चव्हाण याला अटक करण्यात आली, तर इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षिका डॉ. आरती सिंग, मालेगावचे अप्पर अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील आहिरे, हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले, पोलीस नाईक राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, कॉन्स्टेबल फिरोज पठाण, रतिलाल वाघ, दत्ता माळी, महिला पोलीस कर्मचारी भारती सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.