दरोडेखोरांच्या टोळक्याला अटक

सामना प्रतिनिधी । नाशिक

सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी मध्यरात्री दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना पकडण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सॉक्स कंपनीजवळ सात ते आठ तरुण लपलेले आढळले. त्यांना पोलिसांच्या गस्ती पथकाने हटकले असता काहींनी अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. त्यातील पाचजणांना पथकाने ताब्यात घेतले आहे.

सातपूरच्या राज्य कर्मचारी वसाहतीतील भट्टू प्रकाश दंडगव्हाळ (19), शरद मधुकर पाटील (24), प्रबुद्धनगरचा गोटीराम श्रावण कोरडे (25), अशोक धोंडीराम वायकंडे (24) व कृष्णा प्रकाश वाळके (24) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गुप्ती, पान्हे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.