हिंदुस्थानात बॉम्बस्फोट कराल तर पाताळातूनही शोधून काढू

3

सामना प्रतिनिधी। नाशिक

काँग्रेस आघाडीच्या काळात हिंदुस्थानात ठिकठिकाणी बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होती. सत्ता परिवर्तनानंतर भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात ही परिस्थिती बदलली आहे. दहशतवाद आता फक्त जम्मू-कश्मीरच्या काही भागापुरता मर्यादित राहिला आहे. तेथेही आमचे शूरवीर जवान दहशतवाद्यांचा खात्मा करीत आहेत. आता हिंदुस्थानच्या कुठल्याही भागात बॉम्बस्फोट कराल, तर दहशतवाद्यांना पाताळातूनसुद्धा शोधून काढून शिक्षा देऊ, त्यांना पाठीशी घालणाऱयांनाही धडा शिकवू, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

महायुतीचे उमेदवार नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे, दिंडोरीच्या भाजपाच्या डॉ. भारती पवार, धुळ्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. मी देशाची सुरक्षा, वंशवाद आणि भ्रष्टाचार या गोष्टींवर बोलतो, विकासाची चर्चा करतो. मात्र, हे विरोधकांना सहन होत नाही. दोन टप्प्यांतील मतदानाने झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असेही ते म्हणाले.

पवार सदसद्विवेकबुद्धी सोडून बोलत आहेत – मुख्यमंत्री
भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये गेलेले बहुरूपी या निवडणुकीत स्वातंत्र्यसंग्राम सेनानी म्हणून जेलमध्ये गेल्याचा आव आणत आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना हाणला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करू नये, आम्हाला शिकवू नये, असे सांगत आमच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाऱयांची जागा ही जेलमध्येच असते, असे सुनावले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भलेभले डगमगायला लागले आहेत. कॅप्टन म्हणून मैदानात उतरलेले शरद पवार हे तर बारावे खेळाडू झाले आहेत, सदसद्विवेकबुद्धी सोडून ते भाष्य करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.