नाशिक, निफाडचा पारा १२ अंशांवर

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिकमध्ये आता थंडी जाणवू लागली असून, या हंगामात आज प्रथमच निफाड व नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा १२ अंशांवर घसरला. यामुळे स्वेटर्ससह उबदार कपडय़ांच्या खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी वाढल्याने शहरातील तिबेटीयन मार्केट गजबजले आहे.

यंदा परतीच्या पावसाने जास्त दिवस मुक्काम ठोकल्याने ऑक्टोबरअखेर तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या घरात होते. नाशिकमध्ये काल किमान १२.८ व आज १२.२ इतके तापमान होते. दरवर्षी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे काल १३ व आज १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मात्र, कमाल तापमान ३१ अंशांच्याच घरात असल्याने दिवसा प्रचंड ऊन व रात्री गारवा असे वातावरण आहे. तापमानात मोठी तफावत असल्याने थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा थंडीला उशीरा सुरुवात झाली. मागील वर्षी २ नोव्हेंबरला नाशिकला १०.५, निफाडला १० इतके किमान तापमान होते. आज पारा १२ अंशावर घसरला असला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस १३ ते १४ अंशांदरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे. थंडीची चाहुल जाणवल्याने स्वेटर्स, शाल, मफलर यांच्या खरेदीसाठी नाशिककरांची पावले तिबेटीयन मार्केटकडे वळू लागली आहेत. आजही येथे मोठी गर्दी बघावयास मिळाली.