लाच घेतल्याप्रकरणी अनाथ बालकाश्रमाच्या महिला सचिवाला अटक

सामना प्रतिनिधी। नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमातील मुलाच्या पालन पोषणासाठी पाच हजार नऊशे पन्नास रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आश्रमाच्या महिला सचिवासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

बालकाश्रमाच्या सचिव आशादेवी फकिरराव अहिरराव आणि त्यांचा नातलग परमदेव फकिरराव अहिरराव यांनी एका बालकाच्या पालन पोषणासाठी त्याच्या नातेवाईकाकडे दरमहा सातशे रुपयेप्रमाणे पाच हजार नऊशे पन्नास रुपयांची लाच मागितली. त्यातील तीन हजार शंभर रुपये वेळोवेळी घेतले. सोमवारी उर्वरित दोन हजार आठशे पन्नास रुपयांची मागणी केली. बालकाच्या नातलगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने खात्री करून सापळा रचला आणि मंगळवारी लाच घेताना दोघांना रंगेहाथ अटक केली.