दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची सुटका, एकाला अटक

सामना प्रतिनिधी । नाशिक

दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून चुंचाळे शिवारात एका खोलीत डांबून ठेवलेल्या सतरावर्षीय मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. याप्रकरणी एका परप्रांतीयास अटक करण्यात आली असून, आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

नाशिकच्या चोपडा लॉन्स परिसरातील कैलास गणपतराव जाधव यांचा इयत्ता अकरावीत शिकणारा सतरावर्षीय मुलगा 5 फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता कॉलेजला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्याच्या वडिलांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले, पोलिसांना माहिती दिली. याचदरम्यान कैलास जाधव यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने धमकी दिली की, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, दहा लाख रुपये द्या आणि त्याला सुखरूप घेऊन जा. यानंतर त्याचे अपहरण झाल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुन्हे शाखा व सरकारवाडा पोलिसांचे संयुक्त पथक निर्माण करून शोध सुरू केला.

अपहृत मुलाच्या वडिलांकडून पैसे घेतानाच अपहरणकर्त्याला अटक करण्याची व्यूहरचना आखली. मात्र, अपहरणकर्त्यांनी वेळोवेळी जागा बदलल्याने त्यात यश आले नाही. अपहरणकर्ते हे चुंचाळे, अंबड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी यांच्या पथकाने हा परिसर पिंजून काढला. चुंचाळेतून साहिलकुमार अरुणकुमार झा यास ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखविला. चुंचाळे घरकुल योजनेतील इमारतीतील एका खोलीत अपहृत मुलाला डांबून ठेवल्याची कबुली झा याने दिली. त्याला सोबत घेवून त्या खोलीतून अपहृत मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. साहिलकुमार झा याच्यासह त्याच्या साथीदारांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. झा याला अटक करून त्याने गुह्यात वापरलेली लाल रंगाची हीरोहोंडा सीबीझेड मोटारसायकल जप्त केली. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रवींद्र बागुल, यमाजी महाले, वसंत पांडव, आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, गणेश वडजे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, स्वप्नील जुंद्रे यांच्या पथकाचे या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.