‘बिग बॉस’ पोलीस ठाण्यात

सामना प्रतिनिधी । नाशिक

राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या रोमान्समुळे ‘बिग बॉस’ आता थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे. राजेश आणि रेशमचा रोमान्स हा विवाहबाह्य संबंधांना उत्तेजन देणारा असल्याचा आरोप नाशिक येथील हृषिकेश देशमुख या विद्यार्थ्याने केला आहे. याविरोधात त्याने बुधवारी ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या संचालकांविरोधात पोलीस आयुक्त तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.

राजेश आणि रेशमच्या रोमान्समुळे ‘बिग बॉस’ शो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नाशिक येथील विधी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या हृषिकेश यांनी तक्रार अर्जात म्हटले की, १४ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास प्रसारित झालेल्या भागामध्ये राजेश शृंगारपुरे व रेशम टिपणीस यांच्यातील संवाद अश्लीलतेकडे झुकणारा होता. हा प्रकार मराठी संस्कृतीला काळिमा फासणारा आहे. दोघेही विवाहित असून त्यांचे हे कृत्य विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारे आहे.

दरम्यान, प्रसारित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रफितीची चौकशी करून कलर्स वाहिनीचे संचालक, निर्माते यांच्यासह शृंगारपुरे व टिपणीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.