नाशिकच्या विद्यार्थ्यांची एक अफलातून कल्पना…

स्वच्छतेच्या सवयी आपल्याला अजूनही लावाव्या लागतात.

घरातील केरकचरा आपल्याला पैसेही मिळवून देऊ शकतो, हे कधी कुणाच्याही मनात आले नसेल. मात्र नागरिकांनी आपल्या परिसर स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे यादृष्टीने विचार करताना नाशिक येथील अभियांत्रिकी शाखेच्या चार विद्यार्थ्यांना एक भन्नाट कल्पना सुचली आणि कचऱयाच्या बदल्यात पैसे (कॅशबॅक पॉइंट्स) देणारे एक अनोखे एटीएम तयार झाले. हे एटीएम पैसे देते हे खरे असले तरी ते प्रथम तुमची ‘जनरल नॉलेज’ची परीक्षा घेते. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तरच पैसे मिळतात हे महत्त्वाचे !

नाशिक येथील यश गुप्ता, राहुल पाटील, हृषीकेश कासार व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्रकाश सोनवणे हे चौघे संदीप फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहेत. मागील वर्षी डिप्लोमा करताना या चौघांनी आगळावेगळा प्रकल्प तयार करण्याचा निश्चित केले, मात्र कुठला प्रकल्प करायचे यावर त्यांचे एकमत होत नव्हते. शहर स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणारे संशोधन करा, असे प्राध्यापकांनी सांगितले. स्वच्छता अभियानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, त्यात त्यांचाही फायदा व्हावा असे कचऱयाच्या बदल्यात पैसे देणारे एटीएम तयार करण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी त्यांनी तब्बल सहा महिने मेहनत घेतली. वीस हजार रुपये खर्च करून दोन डस्टबिन, एलसीडी डिस्प्ले, आरएफआयडी रीडर, मायक्रोकंट्रोलर, लोड सेल यांचा वापर करीत ही प्रतिकृती आकाराला आली. यात कचऱयाच्या वजनानुसार ठराविक पॉइंट्स संबंधित व्यक्तीच्या आरएफआयडी कार्डमध्ये जमा होण्याची व्यवस्था केली आहे. डस्टबिन भरल्यानंतर त्यातील कचरा मागील मोठय़ा टाकीमध्ये जमा होतो. यासाठीचे प्रोग्रामिंग यश गुप्ता याने केले आहे. हे चार रॅन्चो व त्यांच्या मार्गदर्शक कृतिका अग्रवाल यांच्या नावाचे आद्याक्षर जोडून ‘के.आर.आर.वाय.पी. गार्बेज एटीएम’ असे एटीएमचे नामकरण करण्यात आले. एलसीडी डिस्प्लेवरील माहिती ऐकविली जाते, लवकरच ती मातृभाषेमध्येही ऐकण्याची सुविधा देण्याचा तसेच कचऱयाची वर्गवारी करण्यासाठी डस्टबिनला सेन्सर वापरण्याचाही त्यांचा विचार आहे.

महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, केरळ, तामीळनाडू राज्यातील प्रदर्शनांमध्ये हा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पासाठी त्यांना तब्बल पंधरा पारितोषिके मिळाली आहेत. हा प्रकल्प आता महाराष्ट्र ट्रान्सफॉर्म या स्पर्धेत पोहोचला आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱया सर्वांनाच ही भन्नाट कल्पना आवडली. याद्वारे जास्तीत जास्त कचरा संकलनाला मदत होईल असे अनेकांनी बोलून दाखविले. स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी हे एटीएम उपयुक्त ठरू शकते. सार्वजनिक स्थळी ते उभारले गेले पाहिजे. असे झाल्यास नागरिक कुठेही कचरा फेकणार नाहीत व परिसराचे चित्र पालटेल. यासाठी शासनाने व विविध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.

असे काम करते एटीएम

या एटीएमला ‘ए’ व ‘बी’ नावाच्या डस्टबिन जोडल्या आहेत. व्यक्तीचे नाव, त्याच्या बँक खात्याची माहिती असणारे आर.एफ.आय.डी. कार्ड स्वॅप केल्यास डिस्प्लेवर एक प्रश्न विचारला जातो, त्याचे ‘ए’ व ‘बी’ पर्याय असतात, त्यापैकी अचूक पर्याय लक्षात घेऊन एटीएमच्या संबंधित डस्टबिनमध्ये कचरा टाकावा लागतो. त्यानंतर त्याचे वजन दर्शविले जाते व संबंधित पॉइंट्स कार्डावर नोंदविले जातात. उत्तर चुकले तर कचऱयाच्या बदल्यात पॉइंट्स मिळत नाही. साधारण एक किलोसाठी दहा पॉइंट्स कार्डावर जमा होतात. असे शंभर पॉइंट्स झाले की, दहा रुपये खात्यावर जमा होऊ शकतात. याद्वारे मोबाईल रिचार्ज, ऑनलाइन शॉपिंग करता येऊ शकते.