नाटक – गुलाबी फार्स

>> क्षितिज झारापकर

[email protected]

‘गुलाबी गोंधळ’… जनार्दन लवंगारे यांचा अजून एकनंबरी फार्स. लोकनाटय़ाचा प्रासंगिक विनोद आणि हजरजबाबीपणाचा पूर्ण उपयोग या नाटकात करून घेतला आहे.

हल्ली रंगकर्मींना किंवा कलाकार बनण्याची ऍप्टिटय़ूड असणाऱयांना या क्षेत्रात येण्याचा मार्ग सुकर झालाय. मराठी माध्यमं, मग त्यात वृत्तपत्रेही आली, आपली ओळख टिकवण्यासाठी महाविद्यालयात जल्लोषपूर्ण कार्यक्रम करवताना दिसतात. अग्रगण्य करमणूकप्रधान दूरचित्रवाणीच्या वाहिन्या मराठी नाटकाची निर्मिती आणि प्रस्तुतीकरण करताना आढळतात आणि या सगळ्यामुळे कलाकारी करायला इच्छुक मंडळींना व्यवसायात येण्याचे अनेक मार्ग खुले झालेत. आज कॉलेजमध्ये रेनडान्स करणारी एखादी क्वीन उद्या सरळ एखाद्या सिरीयलची कुलवधू होते. आणि रोझ डेला ज्याला सर्वाधिक गुलाब मिळतात तो लगेच मालिकेत नायक बनतो. आज टीआरपी असणारे नट-नटय़ा आपल्या नाटकात घेण्यासाठी नाटय़निर्मात्यांची चढाओढ चालू असते. पण मराठी रंगभूमीच्या ऐन उमेदीच्या काळात हे असं नव्हतं. तेव्हा नाटकांच्या कार्यशाळा असायच्या ज्यांना नाटय़स्पर्धा म्हणायचे. तशा स्पर्धा आजही आहेत. पण तिथे आपल्या सामर्थ्याने मानमरातब आणि शाबासकी मिळवलेल्या कलाकाराला बऱयाचदा आपण साकारलेली भूमिका कुणा मातब्बर नावाजलेल्या कलाकाराने व्यावसायिक नाटकात साकारलेली पदरच्या पैशातून तिकीट काढून पाहावी लागते आणि आपल्याच कॉलेजातली श्रावणक्वीन केवळ दिसण्याच्या जोरावर मालिकेतून डायरेक्ट नाटकाची हिरॉईन हा प्रवास नव्या एसी लोकलच्या वेगात करताना दिसते. रंगभूमीची सेवा वगैरे बाबींसाठी मग हे स्पर्धेतले रंगकर्मी उरलेले आपल्याला आज दिसतात. पण पूर्वी सगळे रंगकर्मी एकमेकांशी प्रामाणिक स्पर्धा करायचे. या स्पर्धांमधून तावूनसुलाखून मग काही रंगकर्मी शंभर नंबरी सोन्यासारखे झळकायचे. त्यातील एक सन्माननीय नाव म्हणजे जनार्दन लवंगारे.

जनार्दन लवंगारे यांची कारकीर्द जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ दीर्घ आहे. गेल्या वर्षी त्यांच्या ‘दोन बायकांचा नवरा’ या नाटकाच्या समीक्षेत मी ती इथे मांडली होती. पुन्हा मांडत नाही. लवंगारेंची मास्टरी जिथे आहे तिथे आपण सरळ वळूयात. जनार्दन लवंगारे लोकनाटय़ाच्या बाजात सामाजिक कॉमेडी सादर करण्यात मास्टर आहेत. असे करण्याचे खूप फायदे आहेत. गणगौळण आणि लावणी नृत्यात न अडकता लोकनाटय़ाचा प्रासंगिक विनोद आणि हजरजबाबीपणाचा पूर्ण उपयोग करून एखादी फार्सिकल गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडता येते हे जनार्दन लवंगारेंनी सिद्ध करून दाखवलंय. याची नवी कोरी एडिशन म्हणजे त्यांचं नवीन नाटक ‘गुलाबी गोंधळ’. या नाटकाने लक्ष वेधून घेतलं ते पहिल्याच जाहिरातीतून. ‘गुलाबी गोंधळ’च्या पहिल्याच जाहिरातीत होती केरळची डोळय़ांच्या अदा करून युटय़ूबवर सेन्सेशन झालेली मुलगी प्रिया वारियर. आता मल्ल्याळी मुलगी मराठी नाटकात नसणार हे कळण्याइतका मराठी प्रेक्षक निश्चितच सुजाण आहेत. पण प्रिया वारियरच्या त्या युटय़ूब व्हिडीओने जो तरुणाईमध्ये एक गोडगुलाबी माहोल तयार केला होता त्याला या जाहिरातीने हात घातला होता. इथे एक विलक्षण व्यावसायिक हुशारी दिसते. ‘गुलाबी गोंधळ’ हे नाटक इथूनच लक्षात राहिलं होतं. या नाटकाचा सोळावा प्रयोग पाहिला. नेहमीप्रमाणेच जनार्दन लवंगारेंचा हा प्रयोग आडवारी म्हणजे सोमवारी दुपारी होता. लवंगारेंची नाटकं वीकएण्डची मोहताज नाहीत. वीक नाटकांना फक्त वीकएण्डलाच प्रयोगाचे चोचले लागतात. पण सोमवार दुपारीही व्यवस्थित प्रेक्षकांसमोर प्रयोग सादर झाला.

‘गुलाबी गोंधळ’ हे नाटक बेसिकली एक फार्स आहे. त्याला ज्योतिषशास्त्राची एक बारीक झालर दिली गेलीये. एका नॉर्मल मुलाच्या लग्नाची ही गोष्ट. या मुलाला अनेक मुली आवडत असतात. त्यातल्या एकीची आई आणि मुलाचे वडील मिळून त्या दोघांनाच एकत्र आणण्यासाठी काय रचतात हे कथानक घडवतो त्या मुलाचा मामा. आता हा मामा खरा महत्त्वाचा… कारण तो ‘गुलाबी गोंधळ’चा सूत्रधार आहे. लोकनाटय़ातला सोंगाडय़ा असतो तसा. इथे दस्तुरखुद्द जनार्दन लवंगारे आहेत. ते नाटकाचा ताबा घेतात आणि संपूर्ण कंट्रोल स्वतःच्या ताब्यात ठेवत ते नाटक पुढे नेतात. यात सचिन कुलकर्णी राजाच्या भूमिकेत त्यांना उत्तम साथ करतो. लोकनाटय़ातली सोंगाडय़ांची जोडी जशी एकमेकांना पूरक असते तशी ही मामा-भाच्याची जोडी या नाटकात आहे. एका बाजूला ही जोडी तंबू सांभाळते तर दुसऱया बाजूला बापूजी आणि सुमित्रा या भूमिकांमधून राम काजरोळकर आणि ज्योती लोटलीकर धमाल करतात. गंमत म्हणजे या दोघांच्यातही लवंगारे यांनी लेखनातून एक रोमॅन्टीक अँगल आणलाय आणि हे दोघे ‘गुलाबी गोंधळ’ प्रणयप्रसंग अत्यंत रंजकतेने रंगवतात. राम काजरोळकरांचा इरसाल बापूजी आणि ज्योती लोटलीकरांची खाष्ट सुमित्रा भरपूर मनोरंजन करतात. सचिन कुलकर्णीचा राजा या सगळ्या बॅटिंगमध्ये राहुल द्रविडसारखा एक बाजू लावून धरतो. केतकी रेश्माने पूनमचं पात्र कमालीचं बिनधास्त आणि लक्षणीय केलंय. तिचे अणि सचिनचे प्रसंग खूप रंगतात. सरिता झालेली नेहा परांजपे योग्य साथ करते. पण हा सगळा डोलारा सांभाळतात जनार्दन लवंगारे. त्यांच्या जातिवंत खुबीने ते कालपरवापर्यंतचे संदर्भ पेरून पंच काढत नाटक पुढे सरकवतात आणि प्रेक्षकांना गुंतवत ठवतात.

या पद्धतीची नाटके लिखाणात आणि दिग्दर्शनात अत्यंत सोपी ठेवावी लागतात. ‘गुलाबी गोंधळ’ असंच आहे. या नाटकाची गंमत सादरीकरणात आहे. त्यामुळे ‘गुलाबी गोंधळ’चा प्रत्येक प्रयोग वेगळा असेल. कारण समोरच्या प्रेक्षकांवर आणि त्यांच्या रिऍक्शनरूपी सहभागावर प्रत्येक प्रयोग वेगळा रंगेल. ‘गुलाबी गोंधळ’ हे नाटक एकत्रितपणे पाहून मज्जा करण्याचे नाटक आहे. जनार्दन लवंगारे यांनी हे जाणून ‘गुलाबी गोंधळ’ त्याच पद्धतीने रचलेले आहे. आता गणेशोत्सवाचा सीझन आहे. ‘गुलाबी गोंधळ’सारखं नाटक अशा उत्सवी वातावरणासाठी एक आयडियल नाटक आहे. चंद्रकला या संस्थेने आपल्या लौकिकाला साजेसे एक धमाल विनोदी नाटक आपल्याला दिलेले आहे.

  • नाटक : गुलाबी गोंधळ
  • निर्मिती : चंद्रकला  
  • निर्माते, लेखक, दिग्दर्शक : जनार्दन लवंगारे
  • नेपथ्य  : प्रवीण गवळी  
  • प्रकाश : महेंद्र भांबीड
  • ध्वनी : दादा परसनाईक
  • रंगभूषा : प्रशांत
  • कलाकार : केतकी रेशमा, नेहा परांजपे, स्वप्ना साने, सचिन कुलकर्णी, राम काजरोळकर, जनार्दन लवंगारे
  •  दर्जा  : ***