नाटकवेड्यांच नाटक

>> क्षितिज झारापकर 

नाटक हे एक मायाजाळ आहे. याची भुरळ पडायला वेळ लागत नाही. एकदा का आपण नाटकाने पछाडलो गेलो की मग नाटक आपल्याला सोडत नाही. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी नाटकच दिसू लागतं. अशी गत असते नाटकवेडय़ा रंगकर्मीची. अशा रंगकर्मींना मग कसलाच मोह नसतो. नाटकांच्या मायावी दुनियेत ते भाबडेपणाने वावरत असतात. त्यांना कैफ चढलेला असतो तो अगणित प्रेक्षकांना आनंद देण्याची नाटकाकडे असणारी अगम्य शक्ती आहे तिचा नाटय़सृष्टी आणि नाटय़शास्त्र वगैरेची चिंता करणारे निराळे लोक असतात. वेगवेगळी सोंगं घेऊन जमलेल्या रसिकांना घटकाभर रिझवता यावं एवढीच माफक अपेक्षा अशा रंगकर्मींची असते. ते निराळे लोक रंगभूमीला वेगळं वळण वगैरे देण्याच्या फंदात असतात. पण रंगभूमी जगते, कारण हे नाटकवेडे रंगकर्मी सातत्याने नाटक करत राहतात. त्यांच्या नाटकांना प्रेक्षक येत राहतात, कारण घटकाभर रिझवलं जाणं हे प्रेक्षकांनाही आवडतं. या एकमेकांच्या संबंधातून हे नाटकवेडे रंगकर्मी आणि प्रेक्षक रंगभूमी जगवत ठेवतात. अधूनमधून मग जाणकार म्हणवणारे येतात आणि काही अभ्यासपूर्ण बदल करतात. ते बदल विलक्षण चपळाईने आत्मसात करून हे नाटकवेडे रंगकर्मी आपलं वेड पुढे चालू ठेवतात. यांचं हे वेड म्हणजे स्वतः झिजून रंगभूमी जिवंत ठेवणे असं असतं. आत्ता आत्ता सरकारने रंगभूमीकरिता राजाश्रय कबूल करत अनुदानाची योजना आणली आहे. तत्पूर्वी दीडशे वर्षं जुनी मराठी रंगभूमी ही अशाच नाटकवेडय़ा रंगकर्मींची जागिर होती. पदरचं सगळं खर्ची पाडून आपलं वेड जपणं इतकंच या रंगकर्मींना ठाऊक होतं. अगदी सुरुवातीच्या काळापासून याची उदाहरणं आहेत. कित्येक रंगकर्मी हे वेड जपताना कफल्लक झालेले आहेत. हे वेड नाटकात आल्यावर सुरू होतं असं नाही. आजही एकांकिका स्पर्धा किंवा प्रायोगिक रंगभूमीवरचे रंगकर्मी पदरचे पैसे खर्च करून प्रयोग करतात हे सर्वश्रृत आहे. पण अलीकडे कफल्लक होण्याची उदाहरणं कमी झालेली आहेत. कारण अन्य व्यवसायातून पैसे कमावून नाटक करणं ही गणितं आता रंगकर्मींना कळलेली आहेत आणि तसे पर्यायही उपलब्ध आहेत. हे सगळं नमूद करण्याचं कारण हे की आज जे नाटक आपण इथे न्याहाळणार आहोत त्याचे कर्तेधर्ते हे आनंदा नांदोस्कर हा असाच एक मराठी रंगभूमी जिवंत ठेवणारा नाटकवेडा रंगकर्मी आहे.

मी लहान असताना हिंदू कॉलनी गणेशोत्सवाच्या मांडवात ताडपत्रीवर बसून नाटकं पहात असे. मराठी नाटकाची माझी पहिली ओळख ही तिथे झाली. तेव्हा पाहिलेल्या नाटकात मी आनंदा नांदोस्करांना पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतय. आता अशी ओळख असल्यावर साहजिकच आत्मीयता अधिक असणार. म्हणूनच ‘नात्यातून गोत्यात’ हे त्यांचं नवीन नाटक येतंय म्हटल्यावर उत्सुकता वाढली. ‘नात्यातून गोत्यात’ हा एक सस्पेन्सफुल फार्स आहे. श्रीनिवास भणगे यांनी तो लिहिलाय. भणगे हे एक उत्तम नाटककार आहेत. त्यांची ‘कॉटेज नं. ५४’, ‘सूनमुख’, ‘शेवट नसलेली गोष्ट’ ही नाटकं आधी आलेली आहेत. सर्वात गाजलेलं आणि आजही सुपरहिट असलेलं ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकाने त्यांची मराठी रसिकांशी खरी गट्टी जमली. अशा उत्तम नाटककाराने लिहिलेलं ‘नात्यातून गोत्यात’ हे नाटक नांदोस्करांनी निवडलं. त्यात आनंदा नांदोस्कर स्वतः निपुण दिग्दर्शक. त्यांनी ‘नात्यातून गोत्यात’ खूपच रंजक पद्धतीने क्राफ्ट केलंय. उगीचच कसलंही अवडंबर न माजवता नांदोस्करांनी येथे नाटकातलं नाटय़ जपत ‘नात्यातून गोत्यात’ आपल्यासमोर उभं केलंय. पण असं नाटक खऱया अर्थाने त्यातील कलाकार उभं करतात.

‘नात्यातून गोत्यात’मध्ये कलाकारांची निवड बिनचूक आहे. सुचित जाधव हा नायक आहे. बावळट नवऱयाच्या भूमिकेत सुचितने धमाल केलीय. हा कलाकार खरंच किती गुणी आहे हे इथे दिसतं. काही काळापूर्वी त्याने ‘षडयंत्र’ या नाटकात एका उद्धट नवऱयाची भूमिका खूप मस्त केली होती. इथे त्याच्या अगदी उलट भूमिका सुचितने तितक्याच सहजपणे साकारली आहे. सुचितच्या देहबोलीतून एक समंजस आणि साधाभोळा नवरा मूर्तिमंत उभा राहतो. ‘नात्यातून गोत्यात’ची नायिका आहे वर्षा नरेश कांबळी. वर्षाने इथे एका चंचल मैत्रिणीची भूमिका केली आहे. इथे वर्षा खूप लोभसवाणी दिसते. तिच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाने वर्षा रंगमंच व्यापून टाकते. तिच्या भूमिकेची गरज आहे की ती सर्वांशी मोकळेपणाने वागते आणि आपल्या एकंदर वावराने वर्षा हे पूर्णपणे दाखवते. खाष्ट पण प्रेमळ बायकोचं काम करणारी प्रियांका कासले ही अभिनेत्री इथे मोजक्या प्रवेशात लक्ष वेधून जाते. प्रियांका खूप नैसर्गिक अभिनय करते. या सगळ्यांपेक्षा आपल्या अभिनयाने आणि एक्सपिरीयन्सने प्रेक्षकांना रिझवतात ते आनंदा नादोस्कर. नायकाच्या सासऱयाच्या भूमिकेत ते येतात आणि नायिकेच्या प्रेमात पडतात. नांदोस्करांचं टायमिंग आणि त्यांचा एकंदर नाटकातला वावर खूपच मजा आणतो. ज्योती लोटलीकर, संजय पाटील, संदीप तटकरे ही मंडळीही आपापल्या भूमिका उत्तम करतात. ‘नात्यातून गोत्यात’ हे अभिनय डिपार्टमेन्टमध्ये जमलेलं नाटक आहे.

एका चांगल्या फार्सिकल कॉमेडीसाठी लागणाऱया सगळ्या बाजू ‘नात्यातून गोत्यात’मध्ये व्यवस्थित सांभाळल्या गेल्या आहेत. उल्हास सुर्वे यांनी साजेसं नेपथ्य केलंय. फार्स करता रंगमंचावर जागा जास्त लागते. विनोदनिर्मितीसाठी पात्रांच्या हालचाली फार्स या प्रकारात जास्त असतात. उल्हास सुर्वे यांनी याचं भान ठेवून ‘नात्यातून गोत्यात’चा दिवाणखाना साकारलाय. पुंडलिक सानप यांनी योग्य प्रकाशयोजना करून रंगत वाढवण्याचा स्तुत्य कार्यभार वाहिलेला आहे. निर्मितीमूल्यांमध्ये कुठेही ‘नात्यातून गोत्यात’ कमी पडत नाही.

श्री भवानी प्रोडक्शन्स या संस्थेचं हे नाटक. ही संस्था आनंदा नांदोस्करांची आहे. आज कित्येक वर्षे ते सातत्याने मराठी नाटके करीत आहेत. किमान ३०-३५ वर्षे या आतबट्टय़ाच्या म्हणवणाऱया व्यवसायात टिकून राहिल्याबद्दल आनंदा नांदोस्कर सर… तुम्हाला सलाम.

*नाटक – नात्यातून गोत्यात
*निर्मिती – श्री भवानी प्रॉडक्शन्स
*लेखक – श्रीनिवास भणगे
*नेपथ्य – उल्हास सुर्वे
*प्रकाश – पुंडलिक सानप
*निर्माते, दिग्दर्शक – आनंदा नांदोसकर
*कलाकार – वर्षा कांबळी, प्रियांका कासले, ज्योती लोटलीकर, राकेश राऊत, संदीप तटकरे, संजय पाटीलआणि आनंदा नांदोसकर
*दर्जा – अडीच स्टार