नाटक -‘समुद्र’ सफर

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘चला हवा येऊ द्या’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या रियॅलिटी शोमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी कॉमेडी क्विन श्रेया बुगडे… हिने ‘समुद्र’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण केले आहे… यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद…

रियॅलिटी शोनंतर रसिकांना आपल्या व्यक्तिरेखेतून काहीतरी वेगळं पाहायला मिळावं याकरिता चांगल्या संहितेच्या शोधात श्रेया बुगडे होती. ‘समुद्र’मध्ये ती मध्यवर्ती भूमिका साकारतेय. याबाबत बोलताना ती सांगते, यापूर्वी बालरंगभूमी आणि गुजराती नाटकात काम केलं होतं. मराठी रंगभूमीवरचं हे माझं पहिलंच नाटक… मध्यवर्ती भूमिकेत दिसणं ही जबाबदारी होती. शिवाय ही व्यक्तिरेखा साकारणं हेही आव्हानात्मक होतं, कारण आतापर्यंत विनोदी कलाकार म्हणूनच माझी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यामुळे मनात थोडं दडपण होतं. त्यामुळे ते मला या वेगळ्या भूमिकेत स्वीकारतील का, असं वाटायचं. कारण हे नाटक कॉमेडी नाही. यामध्ये माझी भूमिका वेगळ्या प्रकारची आहे. याकरिता मला निर्माते प्रसाद कांबळी आणि दिग्दर्शक-सहकलाकार चिन्मय मांडलेकर यांचंही मार्गदर्शन, सहकार्य लाभलं.

या नाटकात श्रेया सध्याच्या काळातील खंबीर गृहिणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तरुण जोडपं आणि त्यांना एक मुलगा आहे. त्यांचा संसार छान चाललाय.. पण तिच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट अशी आहे की, ती तिच्या नवऱयाला माहीत नाही. ती म्हणते, माझ्यात आणि या व्यक्तिरेखेत मोठा फरक हा आहे की, या नाटकातील स्त्र्ााr वेगवेगळ्या परिस्थितीतही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. ही गोष्ट सगळ्यांना जमतेच असे नाही. तिची काही तत्त्वं, मते आहेत. त्यावर ती ठाम आहे. गृहिणी असूनही तिने ते जपलंय. कविता, वाचनाची तिला आवड आहे. वेगवेगळे छंद तिने जोपासलेले आहेत.

या नाटकाचे दिग्दर्शक आणि सहकलाकार चिन्मयसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी तिचं म्हणणे आहे की, पूर्वी मालिकेत चिन्मयबरोबर काम केलयं. मित्र म्हणून त्याला काही वर्षे ओळखते, पण एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्याने स्वतःला घडवलंय, त्याची आता जोमाने वाढ झालीय. हा त्याच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ आहे. या काळात मी त्याच्याबरोबर काम करतेय. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. एक दिग्दर्शक म्हणून बऱयाच बारीकसारीक गोष्टी मला त्याच्याकडून शिकायला मिळत आहेत. त्याची वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करून काम करण्याची पद्धत आहे. भूमिका साकारताना शिक्षक आणि विद्यार्थ्याप्रमाणे तो मला मार्गदर्शन करतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाच्या काही प्रयोगांनंतरही चिन्मय स्वतः प्रत्येक प्रयोगाला हजर असतो. त्यामुळे एखाद्या कलाकाराने काही चांगलं केलं किंवा त्याची काही चूक झाली तर ती त्याच्या लक्षात येते.

नाटकाची मजाच वेगळी

नाटक, मालिका आणि रियॅलिटी शो यापेक्षा जास्त काय भावतं, असं विचारता श्रेया म्हणते, सगळ्याच माध्यमांची स्वतःची एक मजा आहे, कोणतंही माध्यम सोपं नाही. नाटक आणि रियॅलिटी शोची आव्हानं वेगवेगळी आहे. पण नाटक करण्याची मजा वेगळी आहे. कारण रोज वेगळा रसिक प्रेक्षक आमच्यासमोर असतो. दरवेळी, दर दिवशी नाटक तेच असलं तरही ते प्रत्येक वेळी कलाकाराला वेगळ्या पद्धतीने सादर करावं लागतं. एखादं वाक्य वेगळ्या पद्धतीने कसं बोलता येईल पाहता येते. त्यामुळे ही वेगळी नशा आहे. रियॅलिटी शोच्या बाबतीतही जिवंत भूमिका सादर करावी लागते. त्यामुळे दोन्हीची सारखीच मजा मी अनुभवतेय.