कालाहंडी फोडून आज होणार नाथषष्ठी यात्रौत्सवाची सांगता

बद्रीनाथ खंडागळे । पैठण

नाथषष्ठी महोत्सवाचा समारोप कालाहंडी फोडून करण्याची प्रथा पैठण तालुक्यात आहे. ४१९ व्या नाथषष्ठी यात्रौत्सवाची आज सांगता होणार आहे. त्यानुसार संत एकनाथ महाराज समाधी समोर टांगलेली कालाहंडी नाथवंशजांच्या हस्ते फोडली जाणार आहे. आजुबाजुच्या गावांतील भाविक हजारोंच्या संख्येने या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून काल्याचा प्रसाद लुटतात. त्यानंतर या धार्मिक महोत्सवाचा समारोप केला जातो. वारकरी संप्रदायामध्ये काल्याचा प्रसाद व काला-दहिहंडी याला अनन्यसाधारण महत्व आहे.

काल्याच्या प्रसादाची हंडी बनवणे, लाकडी शिंक्यावर लाह्या-गुळाच्या लाडवांची सजावट करणे व हे शिंके नाथमंदिरात ऊंचावर लटकवण्याचा मान पैठणच्या कळमकर कुटुंबाकडे आहे. १७० वर्षांपासून हे काम करणाऱ्या कळमळकर कुटुंबाची चौथी पिढी सध्या या कामात व्यस्त आहे. या सोहळ्यानंतर नाथवंशजांकडून मिळणारे ‘श्रीफळा’ चे मानधन कळमळकर कुटुंबीय लाख मोलाचे मानतात

सुरुवातीचे ‘कामकरी’ आता ‘मानकरी’ बनले
गेल्या १७० वर्षांपासून कालाहंडीची सर्व जबाबदारी पैठणमधील कळमकर कुटुंबाकडे आहे. तत्कालीन नाथवंशजांनी कळमकरांवा कालाहंडीची जबाबदारी सोपवली होती. काही वर्षांनी कालाहंडी तयार करतानाचे हे ‘कामकरी’  ‘मानकरी’ बनले असे तिसऱ्या पिढीतील बाबासाहेब कळमकर (७७) यांनी दिली. त्यांचे आजोबा बंडेराव कळमकर यांनी नाथवंशजांच्या सुचनेवरुन कालाहंडीची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासून कळमकर कुटुंबीय ‘कालाहंडी बनवणारे मानकरी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आता त्यांची चौथी पिढी नाथसेवेचे हे काम करत आहे.

१७० वर्षापूर्वीचे शिंके
कालाहंडी टांगण्यासाठी असलेले लाकडी शिंके हे १७० वर्षांपूर्वीचे आहे. ७ कप्पे असलेल्या या शिंक्याला खालच्या बाजूस लोखंडी हुक लावलेले आहेत. त्यात मोठ्या चेंडूच्या आकाराचे ५१ लाह्याचे लाडू अडकवले जातात. व मधोमध कालाहंडीचा प्रसाद असलेले मातीचे भांडे लावले जाते. हि सर्व प्रक्रिया कालाष्टमीच्या दिवशी नाथमंदिरातच दुपारी ३ वाजेपर्यंत पुर्ण केली जाते. त्यासाठी लागणारे मुख्य साहित्य म्हणजे लाह्याचे लाडू हे मात्र एक दिवस अगोदर ‘सप्तमी’ लाच करावे लागतात.

चौथी पिढी देखील नाथ सेवेत
चौथ्या पिढीतील बापुसाहेब कळमकर व त्यांचे चुलत भाऊ  गेल्या १० वर्षांपासून हे काम करत आहेत. बापुसाहेब यांनी सांगितले की, नंदकिशोर, अमोल, रामेश्वर, संदीप व नागेश असे आम्ही भावंड नाथसेवा बजावत आहोत. पैठण येथील भोईवाड्यात असलेल्या जमधडे कुटुंबाकडून आम्ही लाह्याचे लाडु बनवून घेतो. ज्वारीच्या या लाह्या गुळाच्या पाकात मिसळून त्याचे लाडू तयार करतात. ते आमच्या नाथगल्लीतील घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी कालाष्टमीला मंदिरात कालाहंडी टांगल्यावरच आम्ही जबाबदारीतून मुक्त होतो. या सेवेच्या बदल्यात नाथवंशज आम्हाला नाथवाड्यावर बोलावून शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करतात. तोच आमचा लाखमोलाचा मोबदला आहे !’ असे बापुसाहेब कळमकर यांनी व्यक्त केली.