राष्ट्रीय बॅडमिंटन: प्रणॉय राष्ट्रीय चॅम्पियन, श्रीकांतचा धक्कादायक पराभव

सामना ऑनलाईन । नागपूर

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेंमध्ये बुधवारी एच. एस. प्रणॉयने धक्कादायत निकालाची नोंद केली. पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रणॉयने ४ सुपर सीरिज जिंकणाऱ्या किदाम्बी श्रीकांतचा पराभव करत विजेतेपद पटकावले. प्रणॉयने श्रीकांतचा २१-१५, १६-२१, २१-७ अशा तीन गेममध्ये पराभव केला. प्रणॉयचे राष्ट्रीय स्पर्धेतले हे पहिले विजेतेपद आहे.

सामन्याच्या सुरुवातील श्रीकांतने आपल्या आक्रमक खेळाने उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पहिल्या सेटमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. सेटच्या मध्यांतरापर्यंत प्रणॉयकडे ११-१० अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर प्रणॉयने आणखी आक्रमक खेळ करत श्रीकांतला निष्प्रभ केले आणि सेट २१-१५ जिंकला.

पहिला सेटमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर श्रीकांतने दुसऱ्या सेटमध्ये प्रणॉयला जोरदार टक्कर दिली. दुसऱ्या सेटमध्येही दोघांमध्ये प्रत्येक गुणांसाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. सेटच्या मध्यांतरापर्यंत श्रीकांतकडे ११-१० अशी आघाडी होती. त्यानंतर आपल्या अनुभवाच्या जोरावर गुणांची कमाई करत श्रीकांतने सामन्यात बरोबरी साधत दुसरा सेट २१-१६ असा जिंकला.

दोन्ही सेट रंगतदार झाल्याने अंतिम सेटमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त खेळा पाहायला मिळेल अशी आशा होती. मात्र तिसरा सेट प्रणॉयने एकतर्फी जिंकला. तिसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत प्रणॉयकडे ११-३ अशी आघाडी होती. त्यानंतर प्रणॉयने आक्रमक खेळ करत सेट २१-७ अशा फरकाने जिंकत विजेतेपदावर मोहोर उमटवली.