नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार

सामना ऑनलाईन । जम्मू

पुलवामा जिल्ह्यात एका लष्कराच्या जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज अनंतनाग जिल्ह्यात नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या एका कार्यकर्त्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. मोहम्मद इस्माईल वाणी (60) असे त्या कार्यकर्त्याचे नाव असून तो नॅशनल कॉन्फरन्सचा बिजभेरा ब्लॉकचा अध्यक्ष होता. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

मोहम्मद इस्माईल वाणी यांच्यावर बिजभेरामधील ताजीवारा येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. वाणी यांना तत्काळ श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.