हिंदुस्थानातून ग्रीकमध्ये पोहचलेल्या संशयास्पद लिफाफ्यामुळे खळबळ; तपास सुरू

12


सामना ऑनलाईन । अथेन्स

ग्रीकमधील काही ठिकाणी गेल्या दोन महिन्यात हिंदुस्थानातून काही संशयास्पद लिफाफे पाठवण्यात आले आहेत. सुमारे एक डझनपेक्षा जास्त असे संशयास्पद लिफाफे आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ग्रीकच्या काही विद्यापीठांमध्ये हे लिफाफे पाठवण्यात आले होते. या लिफाफ्यांमध्ये केमिकल होते. त्यामुळे तपास यंत्रणा सतर्कतेने याचा तपास करत आहेत. केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओअॅक्टिव आणि न्यूक्लिअर हल्ल्याच्या शक्यतेनेही याचा तपास करण्यात येत आहे. तर काही लिफाफ्यांमध्ये इस्लामीक साहित्य असल्याचे ग्रीककडून सांगण्यात आले. हिंदुस्थान आणि ग्रीकचे संबंध चांगले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हिंदुस्थानला स्थायी सदस्यत्त्व मिळण्यासाठी ग्रीकने पाठिंबा दिला होता. या घटनेमुळे दोन्ही देशात तणाव निर्माण होऊ नयेत, यासाठी हिंदुस्थानही ग्रीकला सहकार्य करत आहे.

या प्रकारचे सुमारे डझनभर लिफाफे ग्रीकच्या विविध शहरात आणि विद्यापीठात हिंदुस्थानातून पाठवण्यात आले आहेत. अथेन्ससह अरता, स्पार्टा आणि वेलोजमध्येही असे लिफाफे पाठवण्यात आले आहेत. लिफाफ्यांमधील केमिकल शाई आणि गोंद बनवण्यासाठी वापरण्यात येते, असे तेथील तपास यंत्रणेने सांगितले. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले. नाताळ आणि नववर्षादरम्यान हे लिफाफे पाठवण्यात आले आहेत. मिटालिनी आणि लेसवास विद्यापीठात आलेले लिफाफे कर्मचाऱ्यांनी फोडल्यानंतर चेहरा, नाक आणि शरीरावर त्यांना खाज येऊ लागली. तसेच त्यांना अॅलर्जी आणि रिअॅक्शन आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपास यंत्रणेने सर्व संशयास्पद लिफाफे ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच काही लिफाफ्यांमध्ये इस्लामिक साहित्य असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.

या घटनेनंतर ग्रीक प्रशासनाने हिंदुस्थानशी संपर्क साधला आहे. हिंदुस्थानही याप्रकरणी तपासात सहकार्य करत आहे. हे लिफाफे नेमके कोणत्या भागातून आणि कोणी पाठवले याचा तपास करण्यात येत आहे. हिंदुस्थान आणि ग्रीकमधील संबंध बिघडवण्याचा यामागे हेतू आहे काय, याचाही तपास करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या