आपला निसर्ग आपली अभयारण्य

अनंत सोनवणे, [email protected]

अभयारण्य… वनक्षेत्रं… निसर्गाने महाराष्ट्राला आपल्या देशाला भरभरून दिलं आहे. फक्त ते अनुभवण्याची आणि पाहण्याची दृष्टी हवी…

ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली नाही, तर आपल्या मुलाबाळांकडून उधार मिळालेली आहे.

आपण खरंच खूप सुदैवी आहोत. कारण आपण निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिंदुस्थानात जन्माला आलो. आपल्या देशावर निसर्गानं त्याच्या संपदेची मुक्तहस्ते उधळण केलीय. आजही हिंदुस्थानचा बऱयापैकी भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. बरं, या जंगलांमध्येसुद्धा किती विविधता असावी! इथं पानगळीची जंगलं आहेत, तशीच सदाहरित जंगलंही आहेत. इथं गवताळ कुरणांनी बनलेली रानं आहेत, तशीच सूर्यप्रकाशालाही अटकाव करणारी गच्चगर्द वनंही आहेत. इथं खडकाळ भूपृष्ठावर वाढलेली जंगलं आहेत, तशीच दलदलीत पोसलेली अरण्यंही आहेत. कुबेरानं जणू त्याच्या खजिन्यातली पाचूची सर्व व्हरायटी हिंदुस्थानात उधळून टाकलीय.

अभिमानाची बाब म्हणजे या वनसंपदेच्या बाबतीत आपला महाराष्ट्र सुदैवी आहे. संपूर्ण हिंदुस्थानात पाचशेहून अधिक वन्य जीव अभयारण्यं आहेत. सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३५ अभयारण्यं आणि पाच राष्ट्रीय उद्यानं आहेत. विशेष म्हणजे व्याघ्रसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. हिंदुस्थानातल्या पन्नासेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये जगभरातल्या एकूण वाघांच्या संख्येच्या ७० टक्के वाघ निवास करतात. आपल्या महाराष्ट्रातले सहा व्याघ्र प्रकल्प अभिमानानं वाघांचं संरक्षण करतायत.

या सदराच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातल्या अशाच काही जंगलांमधून सफारी करणार आहोत. या जंगलांची व्याप्ती, त्यांचं महत्त्व, त्यांच्या अंतरंगातली जैवविविधता आपण जाणून घेणार आहोत. त्याच बरोबरीने एक निसर्गप्रेमी वन्य जीव पर्यटक म्हणून अभयारण्यांना भेट द्यायची असेल तर प्रवासाचा उत्तम मार्ग, निवासाची सोय, सर्वाधिक योग्य हंगाम इ. विषयक माहितीही यातून मिळू शकेल.

गेल्या दीड दशकाहून अधिक काळ मी वेगवेगळय़ा जंगलांमधून भटकंती करतोय. या भटकंतीदरम्यान आलेले काही अविस्मरणीय अनुभवही यानिमित्ताने वाचकांशी शेअर करता येणार आहेत. ज्यांनी कधीही जंगल भ्रमंतीचा अनुभव घेतलेला नाही, त्यांच्या मनातही आपल्या वनसंपदेबद्दल आस्था आणि उत्सुकता निर्माण व्हावी, हासुद्धा एक हेतू आहेच. मात्र ‘जबाबदार पर्यटना’ची संकल्पना आपणा सर्वांच्या मनात रुजावी, हा सर्वाधिक महत्त्वाचा उद्देश आहे. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जरी निसर्गानं आपल्या पदरी भरभरून दान टाकलं असतं तरी आपल्याला त्याचं मोल अद्याप समजलेलं नाही. एका बाजूला बेसुमार जंगलतोड सुरू असतानाच केवळ पर्यटक म्हणून जंगलांना भेट देणारी मंडळीसुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे वागताना दिसतात. हे चित्र बदलायला हवं.