नेचर वॉक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, वृक्षरुपी सोने ओळखा, त्यांना तोडू नका!

सामना प्रतिनिधी, नाशिक

वृक्षरुपी सोने ओळखा, ही झाडे तोडू नका, त्यांचे संवर्धन करा, असे प्रतिपादन वैद्य विक्रांत जाधव यांनी केले. जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेतर्फे ‘चला वृक्ष बघू या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजरोडजवळील कृषीनगर जॉगींग ट्रक येथे नेचर वॉक उपक्रमात वैद्य विक्रांत जाधव यांनी नाशिकमधील दुर्मिळ वनस्पतींची माहिती दिली, त्यांचे आयुर्वेदातील महत्व पटवून दिले. दसऱ्यानिमित्त आपट्याच्या पानांऐवजी कांचन या वृक्षाची पाने मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली, ही झाडे, त्यांची पाने तोडू नका, या वृक्षांना जपा, असा सल्ला त्यांनी दिला.

झाडांची माहिती देणारा, त्यांची निगा कशी राखावी हे शिकविणारा अभ्यासक्रम गरजेचा आहे, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना ज्येष्ठ पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांनी मांडली. प्रमिला पाटील यांनीही अनेक वनस्पतींची माहिती दिली, वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासिका संध्या तोडकर यांनी रानभाज्या, वनफुले, पावसाळी वनस्पतींची ओळख करुन दिली. यापुढे नेचर वॉक दर महिन्याला घेण्याचे ठरले असून, नाशिककरांना दुर्मिळ वृक्षांची ओळख करून दिली जाणार असल्याचे प्रा. बोरा यांनी सांगितले. त्यांनी वृक्ष आणि पक्ष्यांचे महत्व सांगून वड, पिंपळ, कडूलिंब ही देशी झाडे लावण्याची विनंती केली.

या उपक्रमात पक्षीमित्र चंद्रकांत दुसाने, ज्येष्ठ गिर्यारोहक भीमराव राजोळे, रमेश वैद्य, सागर बनकर, आकाश जाधव, आशीष बनकर, रोहित जाधव, अभिषेक रहाळकर, भाऊसाहेब राजोळे यांसह नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.