Natya Sammelan 2019 लेझीम, दिंडी, चित्ररथांनी नागपूर नगरी दुमदुमली

सामना ऑनलाईन, नागपूर

राज्याच्या उपराजधानीत 35 वर्षांनंतर होणाऱ्या  99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनास नागपूर व विदर्भाची समृद्ध परंपरा प्रदर्शित करणाऱ्या नाटय़दिंडीने आज शानदार सुरुवात झाली.  ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गांधी गेट परिसर दुमदुमून गेला.

व्यासपीठावर फुलांनी सजवलेली पालखी ठेवण्यात आली होती. पालखीमध्ये नटराजाची मूर्ती, राम गणेश गडकरी यांचे ग्रंथ ठेवण्यात आले होते. नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. यावेळी 98व्या अ.भा. मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष कीर्ती शिलेदार, 99व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, कार्याध्यक्ष गिरीश गांधी, प्रमुख निमंत्रक प्रफुल्ल शिलेदार, नाटय़ परिषद मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नागपूर शाखेचे उपाध्यक्ष शेखर सावरबांधे यांच्यासह ज्येष्ठ, युवा रंगकर्मी उपस्थित होते.

महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळय़ाला मानाचा मुजरा व अभिवादन करून नाटय़दिंडीने सुरुवात झाली.  दिंडीवर विविध चौकांमध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशा व ध्वज पथकाच्या गजरात दिंडी निघाली. तुळशीवृंदावन घेऊन चालणाऱ्या मुलींच्या समूहाच्या नेतृत्वात दिंडी मार्गस्थ झाली. दिंडी तेथे पोहचताच टेकडी गणपती,  वारकरी पथक, त्यापाठोपाठ नटराजाची प्रमुख पालखी, भगवा प्रतिष्ठानचे लेझीम पथक, यवतमाळ येथून लोककला दिंडी, श्री गुरू तेगबहाद्दूर गटका आखाडा, नंदनवन येथील यंग टॅलेंट डान्स अकादमीचे लोकनृत्य, शिवकालीन दांडपट्टा सादरीकरण पथक, प्रहार सैनिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सैनिकी प्रात्यक्षिक, सेंट विन्सेट स्कूलचे लेझीम पथक, जुन्या नाटकांच्या सजावटीचा रिक्षा, नागपूरदर्शन – झीरो माईल स्टोन, दीक्षाभूमी, व्याघ्र प्रकल्प, मोठ्ठा बैल व तान्हा पोळा, तंटय़ा भिल, काळी-पिवळी मार्बत असे चित्ररथ निघाले.

रंगकर्मींचा मेळा जमला

नाटय़संमेलनाचे वैशिष्टय़ म्हणजे नागपूर आणि विदर्भातून मुंबईत जाऊन स्थिरावलेले रंगकर्मी सर्वसामान्यांप्रमाणे दिंडीत सहभागी झाले होते. बऱ्याच कालावधीनंतर भेटलेले रंगकर्मी एकमेकांची गळाभेट घेताना दिसत होते. कार्यक्रमात समन्वयाचा अभाव ठिकठिकाणी जाणवत होता. दुपारी 3 वाजता सुरू होणारी दिंडी सवाचार वाजता सुरू झाली.