नाटय़संमेलनाचे लागले वेध

शिबानी जोशी,[email protected]

९८ वे अ. भा. मराठी नाटय़संमेलन १३, १४, १५ जूनला मुलुंडमधील कालिदास नाटय़ संकुलात भरतंय. त्या निमित्ताने…

नाटय़विषयक काम जे राज्यभर चालू असते त्याच्या माहितीची देवाणघेवाण करता येते. त्या त्या भागात सुरू असलेल्या नाटय़चळवळीची माहिती मिळते. रसिकांना आपले लाडके कलाकार प्रत्यक्ष पाहायला मिळतात. पत्रकारांनाही कलाकारांशी थेट संवादाची संधी मिळते. चर्चासत्रे घडतात, कधी कधी चांगले निर्णय घेतले जातात. राजकारणी मंडळी गेल्या काही वर्षांपासून नाटय़ क्षेत्रात येऊ लागल्यानंतर नाटय़संमेलनाचा उद्घाटन समारंभ किंवा सांगता समारंभात मोठय़ा सरकारी देणगीची घोषणाही होते. (अर्थात ते पैसे पाठपुरावा केल्याशिवाय मिळतात की नाहीत हा प्रश्नच आहे.) परंतु असे सर्व गुडी गुडी इथे घडते हे नक्की आहे. मराठी नाटय़ परिषदेला जवळजवळ ११७ वर्षांचा इतिहास आहे. आतापर्यंत ९७ नाटय़संमेलने झाली आहेत. मुंबई आणि आसपासच्या भागांत ३-४ वेळा संमेलने झाली आहेत. यंदाही मुंबईतल्या मुलुंडमध्ये संमेलन होतेय. मुंबईतल्या नाटय़कर्मींना व प्रेक्षकांना त्याचे एवढे अप्रूप नसते. कारण मुंबईत नाटय़विषयक घडामोडी सतत घडत असतात. नाटकाचे प्रयोग तर दररोज वेगवेगळय़ा नाटय़गृहांत होत असतात, परंतु तरीही बाहेरगावच्या रंगकर्मींना मुंबईत येण्याची ही चांगली संधी असते. त्यामुळे मुंबईतील संमेलनही तितकेच उत्साही ठरू शकते.

राज्यातल्या इतर जिह्यांत मात्र आपल्याकडे नाटय़संमेलन घडणार या कल्पनेनेच चैतन्याचे वातावरण निर्माण होते. गेल्या वर्षी  धाराशीवसारख्या दुष्काळग्रस्त जिह्यात संमेलन झाले, परंतु तिन्ही दिवस मायबाप रसिकांनी भरपूर गर्दी केलेली पाहायला मिळाली होती. २-३ व्यावसायिक नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यानिमित्ताने अनेक व्यावसायिक कलावंत आता आपल्या जिह्यात प्रत्यक्ष पाहायला मिळाले होते. गावोगावी संमेलन घेतल्याचा फायदा तिथल्या रसिकांना होतो तसेच कलावंतांनाही गावोगावी प्रत्यक्ष जाऊन संवाद साधना येतो.

अर्थात हल्ली त्या त्या जिह्यातील राजकीय प्रभावाखाली बऱयाच वेळा संमेलने घडताना दिसतात. स्थानिक बलाढय़ राजकारणी जवळजवळ संमेलन स्पॉन्सरच करतो. त्यामुळे त्याचा वरचष्मा तिथे राहतो म्हणजे उद्घाटन व समारोपाला त्यांची लंबीचौडी राजकीय भाषणे, राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रकार या रंगमंचावरून घडताना दिसतात. परंतु सामान्य जनतेला त्याचे थेट देणेघेणे नसते. त्यांना नाटक पाहायला मिळणे, कलावंत पाहायला मिळणे हेच आनंदाभिदान असते ते त्यांना पुरेपूर मिळते. स्थानिक कलाकारांना, विद्यार्थ्यांना नाटक सादर करण्याची संधी मिळते हेदेखील खरे आहे.

यंदा परिषदेमध्ये सत्ताबदल झाला आहे. गेली ५-१० वर्षें ठरावीक साच्यात तोचतोचपणा येऊ लागला होता त्याला यंदा ब्रेक बसला आहे. प्रसाद कांबळी, शरद पोंक्षे, मधुरा वेलणकर असे तरुण पदाधिकारी परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा काहीतरी नवीन, फलदायी कल्पना पाहायला मिळतील असे दिसते. मुख्य संमेलन १३, १४, १५ जूनला

होणार आहे. त्या आधी पूर्वरंग म्हणून  कांजूर, मुलुंड, भांडुप, विक्रोळी इथे स्थानिक शाखेकडून विविध कार्यक्रम होणार आहेत. नॉनस्टॉप सलग ३ दिवस कार्यक्रम केले जाणार आहेत असे कळते.

स्थानिक राजकीय वर्चस्व नसले तरी राजकारणातील व्यक्ती वगळून हे संमेलनही होणार नाहीये. परंतु नाटय़दिंडीपासून संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांचे भाषण, कलावंत मेळावा, बक्षीस समारंभ, मराठी लोककला, लोकनाटय़ाचा नॉनस्टॉप कार्यक्रम, जास्तीत जास्त नाटय़कलावंतांची उपस्थिती असलेल्या नव्या सदस्यांनी आयोजित केलेले संमेलन कसे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. पाहूया काय काय मिळतेय या संमेलनातून नाटय़सृष्टीला…