प्रादेशिक पक्षांमध्ये समन्वयाची गरज

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

देशातील संघराज्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी सर्वच प्रादेशिक पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन बिजू जनता दलाचे नेते आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले. ते आपल्या पक्षाच्या विसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

महानदीच्या पाण्यावरून छत्तीसगडशी असलेल्या वादात आणि पोलावरम प्रश्नावरून आंध्र प्रदेशशी असलेल्या वादात आपल्या ओडिशाला पाठिंबा दिल्याबद्दल पटनायक यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांना धन्यवाद दिले.

राज्यात नक्षलवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी राज्यात तैनात करण्यात येणाऱया केंद्रीय सशस्त्र दलावरील खर्च केंद्र सरकारनेच सोसला पाहिजे असे ते म्हणाले. ओडिशात तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र दलांवरील खर्चापोटी केंद्र सरकारने ओडिशातील पटनायक सरकारला अलीकडेच ३ हजार कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे.