नवी मुंबईकरांना मिळणार श्वान उद्यानाची भेट

सामना ऑनलाईन । ठाणे

नवी मुंबईकरांना लवकरच श्वान उद्यानाची भेट मिळणार असून वाशीच्या सेक्टर 8 मध्ये त्याची तयारी सुरू आहे. नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर वाशीच्या सेक्टर 8 मध्ये हे श्वान उद्यान उभे राहणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी योग्य जागा नव्हती. शहराच्या ट्रॅफिकमध्ये त्यांना फेरफटका मारायला नेणे हे थोडे जिकरीचे असल्याने ही संकल्पना आपण राबवल्याचे नगरसेविका गायकवाड यांनी म्हटले.

हे श्वान उद्योग 870 स्क्वेअर मीटरचे असून त्यासाठी 29.4 लाख खर्च अपेक्षित आहे. या उद्यानात श्वानांसाठी सी सॉ आणि इतर खेळणी असणार आहेत. पुढच्या दोन महिन्यात या उद्यानाचे काम पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनर्जित चौहान यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशी प्रतिक्रिया दिली. तसेच नागरिकांना वेळ घालवण्यासाठी एक चांगले स्थळ मिळेल व यामुळे पाळीव प्राणी दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढेल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.