मार्च अर्धा संपला तरी आवक वाढेना..

सामना प्रतिनिधी। नवी मुंबई

मार्च महिना सुरू झाला की, खवय्यांना वेध लागतात ते हापूस आंब्याचे. मात्र यंदा कोकणात पडलेली अवेळी थंडी तसेच बदललेले हवामान यामुळे हापूसवर विपरीत परिणाम झाला आहे. कोकणातील हापूसला थंडीची बाधा होऊन अक्षरशः हुडहुडी भरली आहे. या क्लायमेंट चेंजमुळे एपीएमसीच्या फळमार्केटमध्ये आवक घटली असून सरासरी फक्त पाच हजार पेटय़ा येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते बारा हजार पेटय़ांनी आवक कमी झाल्याने व्यापाऱयांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.

जगभरातील आंबा खवय्यांची विशेष पसंती असलेल्या कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम जरी फेब्रुवारीमध्ये सुरू होत असला तरी या आंब्याची मोठय़ा प्रमाणात आवक मार्च महिन्यापासून सुरू होते. यंदा आंब्याच्या पेटीचे दर दोन ते पाच हजारांपर्यंत गेल्याने एवढय़ा चढय़ा भावाला ग्राहकही मिळणे मुश्कील झाले आहे.

फळाचा आकार लहान
यंदा अवेळी थंडी पडल्यामुळे आंब्याच्या मोहरावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आंब्याचा आकार सुपारी आणि लिंबाएवढा असताना थंडी पडली आणि पुन्हा मोहराची फूट झाली. त्यामुळे पूर्वीच्या मोहराची फळे मोठी झाली नाहीत. त्यांचा आकार गेल्या वर्षीच्या तुलनेत लहान राहिला आहे. मार्च महिना अर्धा संपला असला तरी कोकणातील थंडी अजून कमी झालेली नाही, याचा परिणाम एप्रिल आणि मेमध्ये निघणाऱया आंब्यावर होईल, अशी प्रतिक्रिया आंबा व्यापारी विजय शेळके यांनी व्यक्त केली आहे.

दलाल, अडते अडचणीत

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱयांसह एपीएमसी मार्केटमधील व्यापारी आणि किरकोळ विक्रेते मोठय़ा आतूरतेने वाट पाहात असतात. काही व्यापारी फक्त आंब्याच्या हंगामातच व्यापार करतात. त्यांची अनेक आर्थिक गणिते या हंगामावर अवलंबून असतात. मात्र यंदा हापूसने दगा दिल्यामुळे शेतकऱयांसह दलाल, अडते, व्यापारी, माथाडी कामगारदेखील अडचणीत आले आहेत, अशी प्रतिक्रिया एपीएमसीच्या फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.