महापौरांच्या पाठीशी मंत्रालयातील अदृश्य शक्ती

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

मंत्रालयातील अदृश्य शक्तीचा पाठिंबा मिळाल्यामुळे जयवंत सुतार हे नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाले, असा गौप्यस्फोट भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी महासभेत केल्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे नगरसेवक महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ का राहिले, याचा उलगडा आता झाला आहे.

महापौरपदी निवड झाल्यानंतर जयवंत सुतार यांनी काल प्रथमच महासभेला संबोधित केले. त्यावेळी नवनिर्वाचित सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी महापौरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला, यावर शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर, संजू वाडे यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांचे अभिनंदन केले. मात्र याचवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी मोठा धमाका केला. महापौरपदी येण्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादीचा पाठिंबा होताच, मात्र त्याचबरोबर काही अदृश्य शक्तींचाही पाठिंबा होता. अदृश्य शक्तींच्या पाठिंब्यामुळे तुम्ही महापौर झाला, असे विधान घरत यांनी करताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. महापौर झाल्यावर जयवंत सुतार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीला राष्ट्रवादीने सदिच्छा भेट, नवी मुंबईतील समस्यांबाबत चर्चा, असे गोंडस रूप दिले असले तरी ही हजेरी केलेल्या उपकाराचे आभार मानण्यासाठीच होती, हे घरत यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.

पहिलीच सभा ‘कोरम’अभावी तहकूब

महापौर जयवंत सुतार यांनी काल पहिल्या महासभेला संबोधित केले. मात्र या पहिल्याच सभेतून राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निघून गेले. सभागृहात कोरम पूर्ण नाही ही बाब ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महासभा तहकूब करण्याची नामुष्की महापौर सुतार यांच्यावर ओढावली.