नवजोत कौरला सुवर्ण पदक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महिला कुस्तीपटू नवजोत कौर हिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी सुवर्ण पदकावर मोहोर उमटवून इतिहास रचला. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू ठरलीय हे विशेष. याचसोबत रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकनेही या स्पर्धेत कास्य पदक पटकावले. आतापर्यंत या स्पर्धेत हिंदुस्थानने एक सुवर्ण, एक रौप्य व चार कास्य पदकांनिशी एकूण सहा पदकांवर नाव कोरले आहे.

नवजोत कौरने ६५ किलो वजनी गटाच्या (फ्रीस्टाइल) अंतिम फेरीत मिया इमाई या जपानच्या खेळाडूचा ९-१ अशा फरकाने धुव्वा उडवला आणि कुस्तीचे मैदान जिंकले. साक्षी मलिकने ६२ किलो वजनी गटात (फ्रीस्टाइल) कझाकस्तानच्या अयॉलीम कॅसिमोवाला १०-७ अशा फरकाने हरवत कास्य पदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. आता पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये बजरंग पुनिया, राहुल आवारे, ओमप्रकाश, जितेंदर व मौसम खत्री यांच्यावर हिंदुस्थानची मदार असणार आहे.