नवनीत समूहाचे डुंगरशीभाई गाला यांचे निधन

सामना ऑनलाईन । मुंबई
नवनीत या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत डुंगरशीभाई रामजी गाला यांचे काल(बुधवारी) रात्री १० वाजता निधन झाले. गेले काही दिवस मृत्यूशी झुंज देत असणाऱ्या गाला यांनी ब्रीच कॅन्डी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. आज(गुरूवारी) सकाळी १० वाजता गिरगावातील चंदनवाडीतील विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंतिंमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली आणि नातू असा परिवार आहे.
साधारणपणे १९५५ साली गिरगावात एक छोटासा छापखाना आणि गाईड प्रकाशनाचा उद्योग गाला बंधू यांनी सुरू केला. आज सुमारे सहा दशकानंतर या कंपनीचे रूपांतर नवनीत पब्लिकेशन्स(इंडिया) लिमिटेड अशा मार्केट लिस्टेड कंपनीमध्ये झाले. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये हा ब्रँण्ड घरोघरी पोहोचला आहे. मुलांना दर्जेदार अभ्यासोपयोगी साहित्य मिळावे आणि यासाठी मुंबईतील अग्रगण्य शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना त्यांनी गाईड लिहिण्यास प्रवृत्त केले. आजच्या तंत्रयुगात जिथे शाळा डिजिटल होऊ लागल्या असता विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी सीडी-रोम आणि तत्सम साहित्याची निर्मितीही नवनीत करत आहे.