मुंबईवरील हल्ला पाकिस्ताननेच केला, नवाज शरीफ यांची अखेर कबुली

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

मुंबईवरील २६/११ चा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला होता, अशी स्पष्ट कबुली माजी पंतपधान नवाज शरीफ यांनीच दिली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे आमचा हात नाही अशी बोंब ठोकणाऱया पाकडय़ांचे दात १० वर्षांनंतर त्यांच्याच माजी पंतप्रधानांनी घशात घातले आहेत. दरम्यान, पाकिस्तान हा दहशतवादी पोसणारा देश असल्याचा पुरावाच जगासमोर पुन्हा आला आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या भयंकर हल्ल्यात पोलीस अधिकारी, जवान शहीद झाले. १६६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात आली होती. हा हल्ला ‘लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफीज सईद आणि पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने केला होता. यामागे पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकारीही होते.

आज ‘डॉन’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पाकडय़ांचा पर्दाफाश स्वतः माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच केला आहे.

काय म्हणाले शरीफ…

– पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. सीमा ओलांडून संघटनांना मुंबईत १५० लोकांचा जीव घेण्याची परवानगी द्यायला हवी का? मुंबई हल्ल्याच्या सुनावणीला रावळपिंडी दहशतवादविरोधी कोर्टात विलंब लागत आहे. ही सुनावणी का पूर्ण होत नाही?

– पाक लष्कर आणि न्यायालय अशी दोन-तीन समांतर सरकारे असतात तेव्हा तुम्ही देश चालवू शकत नाही. ही समांतर सरकारे रोखली पाहिजेत.
– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचे नंदनवन असे म्हटले आहे. याबाबत पाकिस्तान विचार करणार आहे का?