नक्षलवाद्यांनी कोटय़वधी रुपयांची वाहने जाळली

सामना ऑनलाईन।  नागपूर

गडचिरोली जिह्यात नक्षलवाद्यांनी उद्यापासून सुरु होणाऱया पीएलजीए सप्ताहाच्या दोन दिवसापूर्वीच नक्षल्यांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी  एटापल्ली तालुक्यातील वटेपल्ली-गटेपल्ली रस्त्याच्या कामावरील 16 वाहने जाळून टाकली. या वाहनांमध्ये 10 जेसीबी, 3 ट्रक्टर्स, 2 मोटारसायकली व 1 पिकअप वाहनाचा समावेश आहे. या जाळपोळीत कोटय़ावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रीय झाली असून कडक पालिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

काल रात्री सशस्त्र नक्षली काम सुरु असलेल्या ठिकाणी हालेवारा गावाजळ गेले. त्यांनी मजुरांना धमकावून व बराच वेळ ओलिस ठेवून वाहनांची डिझेल टँक फोडली व नंतर वाहनांना आग लावली. मुख्यमंत्री सडक योजनेतून वट्टेपल्ली-गटेपल्ली रस्त्याचे काम सुरु असून, ग्रामसेवकपदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व अल्पावधीतच मोठा कंत्राटदार झालेल्या एका व्यक्तीच्या साळ्याचे हे काम असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरवर्षी नक्षलवादी 2 ते 8 डिसेंबरपर्यंत पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या सप्ताहादरम्यान ते विध्वंसक कारवाया करतात. यावेळी सप्ताहापूर्वीच त्यांनी 16 वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकून आपली दहशत निर्माण केली आहे.

अलिकडेच जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना यास नक्षल्यांनी माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव बनविले आहे. गगन्ना हा नक्षल्यांचा मिलिटरी कमांड असल्याने हिंसाचार करण्यावर त्याचा अधिक भर आहे. त्याच्या नियुक्तीनंतर विध्वंसक कारवाया मोठय़ा प्रमाणावर होतील, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज गडचिरोली जिह्यात खरा ठरला आहे. नक्षलवाद्यांचा प्रमुख बदलल्यापासून घातपातावर नक्षलवाद्यांनी विशेष भर दिला आहे.