नक्षलविरोधी अभियानादरम्यान एक नक्षलवादी ठार

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या दंडकारण्य बंदच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत एक जहाल नक्षलवादी ठार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज एटापल्ली उपविभागातील गट्टा पोलिस मदत केंद्रांतर्गत मुरेवाडा जंगलात आज सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह आढळून आला असून तेथे एके ८ एमएम रायफल व अन्य साहित्यही सापडले. अद्याप या मृत नक्षलवाद्याची ओळख पटली नाही. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक डॉ.हरी बालाजी व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.