कर्नाटकाच्या निवडणुकांवर नक्षलवादाचं सावट

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कर्नाटकातील तमाम राजकीय वर्तुळ व्यग्र असताना तेथील नक्षलवादीही सक्रीय झाल्याचं समोर येत आहे. कर्नाटकातील शिरडी आणि कोडागू भागांमध्ये नक्षलवादी दिसले असून त्यांच्या हालचालींवर सुरक्षा यंत्रणा नजर ठेवत आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी कोयांडू गावानजीक तीन सशस्त्र माणसांना पाहण्यात आलं आहे. खाकी पँट घातलेले ते तिघेही जण तुळू आणि कन्नड भाषा अस्खलितपणे बोलत होते. त्या तिघांनी गावातील कुडीया जमातीच्या काही गावकऱ्यांच्या घरी मुक्काम केला होता. एका गावकऱ्याला २७०० रुपये देत त्यांनी तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थ मागवले तसेच त्याच्या घरात राहून आपले फोनही चार्ज केले. स्थानिक पोलीस त्या घरात पोहोचेपर्यंत ते तिथून निघून गेले होते.

स्थानिक पोलिसांनी तीन नक्षलवादी गावात येऊन गेल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. कर्नाटकात नक्षलवादी दिसण्याची ही पहिली वेळ नसून या वर्षीच्या जानेवारी महिन्यात ३० ते ३५ वयोगटातील तीन नक्षलवादी शिरडी गावानजीक दिसले होते. यात एका महिलेचाही समावेश होता. शिरडीतून त्यांनी काही खाद्यपदार्थ घेतले आणि तिथून निघून गेले.

नक्षलवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी सरकारविरोधी घोषणाबाजी करतात आणि स्थानिक पातळीवर नागरिकांना मतदान करण्यापासून परावृत्त करतात. कर्नाटक, केरळ आणि तमीळनाडू या तिन्ही राज्यांच्या संयुक्त सीमांमध्ये नक्षलजाळं पसरलेलं असून यात कर्नाटक राज्यात चार प्रमुख गट सहभागी होते. पण, या गटांमधील बहुतेक नक्षलवादी हे मारले गेले आहेत किंवा शरण आले आहेत. उर्वरित नक्षलवादी हे कधी कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तेव्हा ते बहुतेक वेळा गावांमध्ये दिसून येतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये अडथळे आणण्यासाठीच नक्षलवादी सक्रीय झाल्याची खात्री देता येणार नाही, असं नक्षलवाद विरोधी पथकाचं म्हणणं आहे.