बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा रेल्वे स्टेशनवर हल्ला, कर्मचाऱ्याचे अपहरण

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील मसूदन रेल्वे स्टेशनवर मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. यावेळी नक्षलवाद्यांनी रेल्वे स्टेशनला आग लावली आणि दोन रेल्वे कर्मचाऱ्याचे अपहरण केले. यातील एक जण स्टेशन मास्तर आहे. या घटनेनंतर बिहारची रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली असून भागलपूर-किऊल हा रेल्वेमार्ग ठप्प झाला आहे.

नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास रेल्वे स्टेशनवर हल्ला केला. यावेळी स्टेशन मास्तरने पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला असता नक्षलवाद्यांनी त्याला व त्याच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली व बंधक बनवले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी रेल्वे स्थानक व सिग्नल पॅनलला आग लावली. आग सगळीकडे पसरू लागताच नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला. जाताना नक्षलवादी आपल्याबरोबर त्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांनाही घेऊन गेले.

रेल्वे स्टेशनवर हल्ला झाल्याचे समजताच पोलीस व रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला होता. दरम्यान, अपहरण झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे जमालपूर रेल्वे पोलीस अधिकारी शंकर झा यांनी सांगितले आहे.