नक्षलवादी नेता अरविंदकुमारचा मृत्यू

सामना प्रतिनिधी। नागपूर

नक्षलवादी नेता अरविंदकुमारचा (६२) बुधवारी सकाळी झारखंड-ओडिशा सीमेवर हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अरविंदकुमार केंद्रीय समितीसह सेंट्रल मिलिटरी कमांडचा सदस्यही होता. तो दंडकारण्यासह ओडिशा, झारखंडमध्ये सक्रिय होता. त्याला पकडून देणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार होते.

जहाल नक्षलवादी अरविंदने १९६७ च्या काळात माओइस्ट कम्युनिस्ट सेंटरच्या माध्यमातून काम सुरू केले होते. त्याचा जनसंपर्क दांडगा असल्याने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या भागात त्याने संघटनेला मजबूत केले होते. तसेच २००४ मध्ये माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर आणि पीपल्स वॉर ग्रुप या दोन नक्षलवादी संघटनांचे एकत्रीकरणासाठीच्या चर्चेतही त्याची महत्वपूर्ण भूमिका होती. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर भाकपा माओवादी संघटनेत त्याला केंद्रीय समितीचा सदस्य बनविण्यात आले.

गंगन्ना या अतिजहाल नक्षलवादी नेतृत्वातील सेंट्रल मिलिटरी कमांड बड्या घटनांचे नियोजन, सुरक्षा दलांवर हल्ले करीत असते. अरविंदनेही अनेक बड्या घटनांमध्ये सहभाग नोंदविला होता. वय झाल्याने त्याची प्रकृती ढासळली होती. यातच त्याचा मृत्यू झाल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.