साहित्य संमेलनात नयनतारा आल्याच!


पंजाबराव मोरे, यवतमाळ

पाहुण्याला बोलवायचे आणि मग येऊ नको सांगायचे. 92व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांनाही तशीच विनंती करण्यात आली. पण कितीही नाही म्हटले तरी नयनतारा संमेलनाला आल्याच!! मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी नयनतारा यांच्या ‘बंदी घातलेल्या’ नियोजित भाषणातील काही अंश वाचून दाखवत संयोजकांवर निशाणा साधला, तर विद्यमान संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांनीही ही नामुष्की निषेधार्ह आहे, असे म्हणत संताप व्यक्त केला.

कुणीही यावे आणि साहित्य संमेलन वेठीस धरावे हे चालणार नाही. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे-अरुणा ढेरे, संमेलनाध्यक्ष

नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणे ही महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सहगल यांच्या निमंत्रण वापसीचा निषेध करतो- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

मराठी सारस्वतांच्या मेळय़ाला उत्साहात सुरुवात झाली खरी, पण त्यात निषेधाचे सूरही उमटले. संमेलनाला उपस्थित निमंत्रित तीन कवयित्रींनी नयनतारांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. महिला पोलिसांनी त्यांच्याकडील मुखवटे जप्त करून त्यांना मंडपातून बाहेर काढले.