इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा खून, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याविरूद्ध गुन्हा

सामना ऑनलाईन, किनवट

गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड (३५) यांचा गुरुवारी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान तीक्ष्ण हत्याराने खून केल्याने किनवट शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी किनवट पोलिसां  सुरेखा यांचा पती विजय राठोड, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैशाली माने, अशोक टोपा राठोड, प्रमोद (अजय) थोरात, आणि सुरेखा यांच्या सासू अनूसया टोपा राठोड यांच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने त्यांची पतीनेच त्यांना ठार मारले असावे अशा संशय व्यक्त केला जात आहे.

किनवटलगत असलेल्या गोकुंदास्थित शिवनगरी भागातील राहणाऱ्या शांतिनिकेतन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड या दररोज सकाळी दहाच्या सुमारास शाळेत जात असत. परंतु त्या शाळेत आल्या नाहीत म्हणून त्या शाळेतील एक शिक्षक राहुल वाडे यांनी त्यांना फोन केला असता त्यांचा आवाज नीट येत असल्याचे त्यांनी सांगितले. परत फोन केला असता फोन रिसीव्ह होत नव्हता. दररोजच्या प्रमाणे भांडे व कपडे धुणारी मोलकरीण बाराच्या आसपास घरी गेली असता तिने प्रथम गेटवरून आवाज दिला. घरातील मुख्य दरवाजाजवळ जाऊन दरवाजा ढकलून बघितला असता सुरेखा राठोड रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तिने शेजाऱ्यांना आरडाओरड करत बोलावून घेतले. त्यांचा गळा चिरलेला असावा. शेजाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर तातडीने पोलीस दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळावर नांदेड येथील डायमंड टेलर याने शिवलेला पांढरा शर्ट सापडला. मयताचे पती विजय टी. राठोड हे वानोळाच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.