पवारांकडून राहुल गांधींचे कौतुक, काँग्रेससोबत पुन्हा आघाडीचे संकेत

सामना ऑनलाईन । कर्जत

कर्जत येथे आयोजित चिंतन बैठकीनंत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करत काँग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले आहेत. समान विचारधारा असणाऱ्या पक्षांमंध्ये आघाडी शक्य असल्याचे सुतोवाच यावेळी पवार यांनी केले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस आल्यास त्यासोबत आघाडी होऊ शकते का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, आघाडी ही नेतृत्वाकडे बघून होत नसते तर ती किमान समान कार्यक्रमावर होत असते. राहुल गांधी यांची प्रश्न जाणून घ्यायची तयारी असते. त्यांना यामध्ये सातत्य ठेवावा असा सल्ला दिला आहे, असे पवार म्हणाले. तसेच गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. प्रफुल्ल पटेल याबाबत बोलणी करत आहेत. त्यांचे नक्की काय बोलणे झाले याची माहिती अद्याप आपल्याला मिळाली नसल्याचे पवार यांनी सांगितले.

२०१९मध्ये शरद पवार पंतप्रधान होतील असे भाकीत करणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘प्रफुल्ल पटेल यांनी कारण नसताना पंतप्रधान पदाचा मुद्दा काढला आहे. आपण निम्म्या जागा लढवून देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणे अवास्तव आहे. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, ते पंतप्रधानपदाचे खुळ डोक्यातून काढून टाका,’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.

दरम्यान, चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. महागाई वाढते तेव्हा देश प्रगतीच्या मार्गावर असतो असे सांगत देशात सध्या उलटे वारे वाहात आहेत. देशातील वातावरण चिंता वाटावे इतपत खराब आहे, असे ते म्हणाले.

sharad-pawar-pc

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या ३ वर्षात राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अमरावतीमध्ये ते सगळ्यात जास्त आहे. तसेच आम्ही लाभार्थी नाही तर आम्ही अपमानीत अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. खरे लाभार्थी हे सत्तेत बसलेले आहेत. बेरोजगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही पवार म्हणाले.

भाजप सरकारकडून सामान्य नागरिकांना प्रत्येक ठिकाणी आधारची सक्ती केली जात आहे यावर चिंतन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, आधार सक्ती हा खाजगी आयुष्यावर मर्यादा आणणारा विषय आहे. काळ्या पैशांच्या शोधासाठी देशभर उद्योगपती आणि व्यावसायिकांवर धाडी घालण्यात आल्या. या धाडीदरम्यान कंपनीतील स्टाफला मारझोडही करण्यात आली. मात्र त्यातून सिद्ध काहीच झाले नाही. एवढेच नव्हे तर विदेशातील काळा पैसा अद्याप देशात परत आलेला नाही. मग हे सरकार काय करत आहे?