राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा

 सामना ऑनलाईन, बीड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडीत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय माजी मंत्री शिवाजीराव पंडीत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पोलिसांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण २८ जणांविरोधात ही कारवाई केली आहे, ज्यामध्ये या दोन बड्या नावांचा समावेश आहे.

प्रकरण काय आहे ?

अमरसिंह पंडीत यांचा जय भवानी सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्यासाठी त्यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १४ कोटींचे कर्ज घेतले होते. यासाठी त्यांनी एक जमीन तारण ठेवली होती. ही जमीन त्यांनी खोटी कागदपत्रं करून दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांनी यांनी या फसवणुकीबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.