ठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे पद रद्द

सामना प्रतिनिधी । ठाणे

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र दिल्याबद्दल व अनधिकृत बांधकामांची माहिती लपवल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद शनिवारी ठाणे महापालिका आयुक्तांनी रद्द केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करत आयुक्तांनी ऐन दिवाळीत मोठा धमाका केला आहे. नगरसेवकाचे पद रद्द करण्याची ठाणे महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. काही दिवसांपूर्वी ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणावरून भाजप नगरसेवक सुधीर बर्गे यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता राष्ट्रवादी नगरसेवकाचे पद रद्द झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अब किसका नंबर अशीच चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रभाग क्रमांक 31 ड मधून मोरेश्वर किणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यांनी जातीसंदर्भात खोटी व अपूर्ण माहिती दिली. तसेच मुंब्रा येथील गणेश पॅलेस व ठाकूरपाडा येथील लक्ष्मी सावला या दोन अनधिकृत इमारती बांधल्याची माहिती लपवली. त्याविरोधात बाळासाहेब जांभळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 26 ऑक्टोबर रोजी मुंब्रा सहाय्यक आयुक्तांमार्फत चौकशी पूर्ण केली. यात मोरेश्वर किणे दोषी आढळल्याने आयुक्त जयस्वाल यांनी त्यांचे पद रद्द केले.