Video- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा पोलिसांसोबत राडा, भर चौकात दीड तास रंगलं नाट्य

1

सामना ऑनलाईन । कल्याण

नो पार्किंग झोनमधून मित्राची मोटारसायकल उचलल्याच्या रागातून कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने गोंधळ घातला. शरद गवळी असे या राडेबाज पदाधिकाऱ्याचे नाव असून तो राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. शरद आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र शरदला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची दमछाक उडाली. त्याने भर चौकात तब्बल दीड तास गोंधळ घातला.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात नो पार्किंग झोनमध्ये मोटारसायकल लावल्याने वाहतूक पोलिसांनी शरदच्या मित्राची मोटारसायकल उचलली होती. पोलिसांनी त्याला 200 रुपये दंड भरून मोटारसायकल घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्याने दंड भरण्यास नकार देत शरदला बोलावून पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरेरावी केली. मात्र समजूत काढूनही एकत नसल्याने पोलिसांनी त्यांना जीपमध्ये बसवून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद काही केल्या पोलिसांना दाद देत नव्हता. शरदला गाडीत बसवण्यासाठी पोलिसांना जवळपास दीड तास लागला. पोलिसांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी शरद आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली असून इतर दोनजण फरार आहेत.