हवामान खात्याच्या तोंडात पडणार बारामतीची साखर

सामना ऑनलाईन, पुणे
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याच्या कारभारावर टीका केली होती. १९ तारखेला राज्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज पहिल्यांदाच खरा ठरला. कारण गेले आठवडाभर राज्यात चांगला पाऊस झाला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला शब्द पाळत हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांना बारामतीची साखर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी या शास्त्रज्ञांना ही साखर भरवणार आहेत. मात्र अशा पद्धतीने साखर खायची वेळ आल्याने या शास्त्रज्ञांचं तोंड कडू होणार अशी चर्चा पुण्यात रंगली आहे.

जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हवामान खात्याच्या ‘अंदाज’पंचे कारभारावर टीका केली होती. हवामान खात्याने १९ ऑगस्टला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. हल्ली या अंदाजांवर शेतकरी विश्वास ठेवेनासे झालेले आहेत, मात्र आश्चर्यकारकरित्या यंदाचा अंदाज बरोबर ठरला. यावेळचा अंदाज खरा ठरल्यास मी या तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन अशी खोचक टीका पवार यांनी केली होती.