व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, शिवसेनेचा पाठिंबा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय नगरविकास मंत्री, ज्येष्ठ भाजप नेते व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहे. एनडीएच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. तसेच व्यंकय्या नायडू उद्या (मंगळवारी) उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असेही शहा म्हणाले.

उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांचं नाव स्पर्धेत असल्याचं बोललं जात होतं. मात्र व्यंकय्या नायडूंचं यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानं या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शिवसेनेचा पाठिंबा –

उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून माहिती दिली. एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांना शिवसेनेचे पूर्ण समर्थन असणार आहे अशी माहिती खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

नायडू-गांधीत लढत –

याआधी युपीनेही उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना युपीएने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे.

नायडूंचा अल्पसा परिचय –

व्यंकय्या नायडू यांच्याकडे केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. नायडू यांनी २००२-०४ या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. तत्कालीन पतंप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण हिंदुस्थातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं.