राजस्थानचे पैसे पाण्यात, महागड्या खेळाडूंचा फ्लॉप शो

onkar-danke>> ओंकार डंके

 

युवा आणि नवोदीत खेळाडूंवर भर देऊन संघाची बांधणी करणे ही राजस्थान रॉयल्सच्या संघाची आजवरची खासीयत होती. शेन वॉर्नने नव्या खेळाडूंना हाताशी धरत आयपीएलच्या पहिल्या हंगामात थेट विजेतेपद पटकावले होते. यंदा राजस्थानने आपली ही पद्धत बदलत टी-२० मधील स्टार खेळाडूंना प्राधान्य दिले होते. त्या खेळाडूंसाठी भरभक्कम पैसेही राजस्थानने मोजले. मात्र पहिल्या चार सामन्यात या महागड्या खेळाडूंनी राजस्थानला निराश केले आहे.

डर्सीचा खेळ झाला ‘शॉर्ट’

ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश’ या टी-२० लीगमध्ये डर्सीची बॅट चांगलीच तळपली होती. होबार्ट हुरिकेनकडून खेळणाऱ्या डर्सीने या बिग बॅश हंगामात सर्वाधिक धावा केल्या होत्या. १५० च्या स्ट्राईक रेटने खेळणारा ऑस्ट्रेलियाचा नवा ‘डेव्हिड वॉर्नर’ असे त्याचे वर्णन जॉर्ज बेलीने केले होते. तोच डर्सी या स्पर्धेत धावांसाठी झगडतोय.

४ सामन्यात १६.२५ च्या सरासरीने त्याने ६५ धावा केल्या आहेत. पहिल्या दोन सामन्यात तो धावबाद झाला. याचा परिणाम राजस्थानच्या इनिंगवर झाला. बुधवारी कोलकाताविरुद्ध अजिंक्य रहाणे अगदी सहज गोलंदाजांची धुलाई करत असताना डर्सी मात्र धावांसाठी झगडत होता. त्याने ४४ धावा काढल्या. पण यासाठी त्याने ४३ चेंडू खर्च केले होते. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेटही ९७.०१ इतका घसरला आहे.

स्टोक्सची होतेय ससेहोलपट

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा जागतिक क्रिकेटमध्ये कायम चर्चेत राहणारा खेळाडू आहे. बॅटींग आण बॉलिंग अशा दोन्ही प्रकारात एकहाती संघाला विजय मिळवून देण्याची स्टोक्सकडे क्षमता आहे. स्टोक्ससाठी राजस्थानने यंदा तब्बल साडेबारा कोटी रुपये मोजले होते.

स्टोकसचा जलवा या स्पर्धेत आजवर फारसा दिसलाच नाही. त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात छाप टाकण्यात अपयश आले आहे. स्टोक्सने ४ सामन्यात ११९.३ च्या स्ट्राईक रेटने अवघ्या ५२ धावा केल्या आहेत. त्याला एकदाही ३० चा टप्पा ओलांडता आलेला नाही. २७ ही स्टोक्सची सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीमध्ये तर त्याने आणखी निराशा केली आहे. त्याला या स्पर्धेत फक्त १ विकेट मिळाली आहे. त्याने त्यासाठी प्रती षटक ९.७५ च्या सरासरीने धावा मोजल्या आहेत.

जयदेवचा जलवा गायब

सौराष्ट्रचा जयदेव उनाडकट हा या आयपीएलमधील सर्वात महागडा हिंदुस्थानी खेळाडू आहे. लिलावाच्या  वेळी त्याला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये अक्षरश: चढाओढ लागली होती. अखेर अचानक राजस्थान रॉयल्सने तब्बल ११.५ कोटींची थैली रिकामी करुन जयदेवला खरेदी केले.

राजस्थानच्या गोलंदाजीचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी जयदेवच्या खांद्यावर आहे. पहिल्या चार सामन्यात जयदेव या जबाबदारीला समर्थ न्याय देऊ शकला नाही. जयदेवने ४ सामन्यात तब्बल ११ च्या इकनॉमी रेटने १२१ धावा मोजल्या आहेत. जयदेवला अवघ्या २ विकेट्स मिळाल्या आहेत. जयदेवच्या खराब फॉर्ममुळे राजस्थानची अनअनुभवी गोलंदाजी आणखी उघडी पडली आहे.

डर्सी शॉर्ट, बेन स्टोक्स आणि जयदेव उनाडकत या तीन खेळाडूंसाठी राजस्थानने ८० पैकी तब्बल २८ कोटी रुपये मोजले आहेत. मात्र याच महागड्या खेळाडूंनी राजस्थानला निराश केले आहे. ही स्पर्धा सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने प्रती धावा/विकेटमागे किती रुपये याचे प्रमाण मुद्दाम दिलेले नाही. मात्र यांचा हाच फॉर्म कायम राहिल्यास हे प्रमाण आणखी व्य़स्त होणार आहेच. त्याशिवाय राजस्थान रॉयल्सच्या स्पर्धेतील वाटचालीवरही याचा मोठा परिणाम होणार आहे.