पोटापुरता पैसा पाहिजे

>>दिलीप जोशी  

[email protected]

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला. जिथे दुष्काळ होता तिथे तर अतिवृष्टीही झाली. नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. विहिरींना काठापर्यंत पाणी आलं. अर्थातच धरती तृप्त झाली. आता ओल्या दुष्काळाचा त्रास काही भागात झालाच आणि काही मोजके भाग अतिवर्षावातही कोरडेच राहिले. निसर्गाची कृपा आणि अवकृपा या खात्यावर आपण हे सारं जमा करतो. निसर्ग तर निर्हेतुक लहरी आहेच. त्याला आपलं काही देणंघेणं नाही. पण आपल्याला मात्र आहे. निसर्गाची लहर ओळखून आणि सांभाळूनच माणसाची प्रजाती  इथपर्यंतची प्रगती करू शकली आहे. उपलब्ध साधनसंपत्तीची वेगवेगळी मांडणी माणसाला करता येते; परंतु निसर्गावर मात केली म्हणण्याइतका ‘मातलेपणा’ ठीक नाही आणि ते शक्यही नाही. एखादी सुनामी, एखादा भूकंप किंवा एखादा झंझावात मानवी वस्तीत हाहाकार कसा उडवू शकतो याचा अनुभव माणसाने शतकानुशतकं घेतला आहे.

पृथ्वीवरची मानवी वस्ती काही लाख आणि  मग कोटीत गेल्यापासून हा निळा-हिरवा ग्रह माणसाचं पालनपोषण करत आहे. आता माणसांची संख्या सात अब्जांवर गेली आहे. निसर्गातील पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. माणूस इंटेलिजंट किंवा बुद्धिमान प्राणी असल्याचं द्योतक काय तर तो सभोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीतही आपल्याला अनुकूल असा बदल घडवून आपलं अस्तित्व टिकवू शकतो. केवळ नैसर्गिक प्रेरणेवर जीवन अवलंबून असणाऱया झाडेझुडपे आणि पशुपक्ष्यांना ते शक्य होत नाही. निसर्ग फारच प्रतिकूल झाला की त्यांच्या अस्तित्वावरच घाला येतो.

दुष्काळावर उपाय म्हणून माणूस जलाशय निर्माण करतो. ऊन, वारा, पाऊस यापासून स्वतःचा बचाव करणारी घरं बांधतो. आजच्या वेगवान युगात तर अफाट गतीने इकडून-तिकडे माहिती आणि संसाधनं नेऊ शकतो. स्थलांतरित पक्ष्यांना  यातलं काहीच करता येत नाही. अन्नाच्या शोधात किंवा प्रजोत्पादनासाठी हजारो किलोमीटरचा हवाई प्रवास करून येणारे फ्लेमिंगोसारखे पक्षी नैसर्गिक प्रेरणेने आपला नवा निवास शोधतात. दरम्यान, माणसाने तो नष्ट केला असेल तर त्यांची वसाहत बेघर होते. पुन्हा पंखात बळ आणून ते नव्या वाटा शोधू लागतात.

पशुपक्षी, कीटक यांची जीवनपद्धती ठराविक जीवनक्रमानुसार चालते. माणसासारखे लहरी बदल त्यात होत नाहीत. मधमाश्या फुलातला मध सोडून इतर काही गोळा करत नाहीत. माणूस मात्र  कल्पकतेने धान्य पिकवतो. त्याचं सुग्रास अन्न बनवतो. जगभरच्या विविध भागांतल्या  मानवी समूहांचं जिव्हालौल्य काय वर्णावं! हजारो पदार्थ आणि त्यांची प्रत्येकाची निराळी चव. एकाच पदार्थाच्याही दहा ‘चवी’ असू शकतात. प्रत्येक समूहाच्या, घराच्या किंवा व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार पदार्थाची चव पसंत केली जाते. इतर प्राणी त्यांच्या आहाराचा केवळ आस्वाद घेतात. माणूस अनेकदा आपल्या आहाराचा अकारण अहंकारही चघळतो.

खाद्यपदार्थ निर्माण करणारे अर्थात सर्वांच्या पसंतीला उतरेल असे विविध पदार्थ बनवतात. पट्टीचे खवैये त्यावर  ताव मारतात. कोणी काय आणि किती खावं याचा हिशेब मांडू नये हे खरंच. पण एक जुनी म्हण सावध इशारा देताना सांगते की, ‘खाऊन माजावं, टाकून माजू नये’… यात थोडा फरक करून ‘खाऊनही माजू नये’ असं म्हणता येईल. पण अन्न टाकण्याचा माज मात्र कुणीच दाखवू नये. पण या सुज्ञपणाच्या गोष्टी माणसाच्या जगाला रुचतात आणि पचतात का? अजिबात नाही. कारण युनोच्या अन्नशेतीविषयक अहवालात माणूस वाया घालवत असलेल्या अन्नाचं प्रमाण एकूण तयार अन्नाच्या २० टक्के असल्याची धक्कादायक गोष्ट नोंदली गेली.

दोन प्रकारे अन्न वाया जातं. नको तेवढं खाऊन (ओव्हरइटिंग) आणि ताटातलं बरंच अन्न ‘टाकून’ देऊन. लग्नसराईत आपल्याकडे कितीतरी अन्न वाया जातं. परंतु अन्न वाया जाण्याचा प्रकार जगात सर्वत्रच आहे. कधी ‘आग्रहा’मुळे, तर कधी नावड म्हणून आणि अनेकदा आपल्याच भुकेचा अंदाज न आल्याने अन्नाची नासाडी होते. अतिसेवनाने आजार होतात हे ठाऊक असूनही जगात सुमारे दोन अब्ज टन अन्न वाया जातं.

अनेक देशांत जेव्हा विक्रमी धान्योत्पादन होतं तेव्हा ते साठवण्याची चांगली व्यवस्था नसेल तर कितीतरी धान्य उंदीर फस्त करतात. जगाच्या काही भागातल्या लोकांना नको तेवढा आहार उपलब्ध असतो, तर अनेक भागांत भूकबळी पडतात. हे विषम वितरण व्यवस्थेतून घडतं. आपल्या तथाकथित प्रगत जगातल्या या मूलभूत समस्याही माणूस नीट सोडवू शकलेला नाही. पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी’ असं अगदी विरागी वृत्तीने राहण्याची गरज नसली तरी उपलब्ध अन्नधान्याचा कणन्कण सत्कारणी लागेल एवढं तरी बुद्धिमान माणूस करू शकतो. ‘मला परवडतं’ म्हणत बेफिकिरीने वागणाऱयांनी आपलं ‘परवडणं’ हे जागतिक अर्थ आणि अन्नोत्पादनावरच अवलंबून आहे हे लक्षात घ्यायला हवं. एवढं करून कष्टाने धान्य पिकवणाऱया बळीराजाची झोळी दुबळीच राहते याचा विचार भरल्यापोटी तरी करायला हरकत नसावी.

आपली प्रतिक्रिया द्या