सर्वसामान्य जनता शिवसेनेच्या पाठीशीः आमदार निलम गोर्‍हे

सामना प्रतिनिधी । नगर

शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी सातत्याने उभी राहते. विकासामध्ये शिवसेनेचे योगदान नेहमीच असते, म्हणून सर्वसामान्य जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहते. नगर शहर भयमुक्त करताना शहराचा विकासही शिवसेनेने केला आहे. आगामी काळात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर काही प्रकल्प आणून शहराच्या विकासामध्ये निश्‍चितपणे भर दिला जाईल, असे प्रतिपादन शिवसनेच्या उपनेत्या निलम गोर्‍हे यांनी केले असून महारगरपालिकेत शिवसेनेचीच सत्ता येणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे जिल्हयाचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकर्‍यांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शहरातील केडगाव येथे आज प्रभाग क्रमांक 16 व 17 च्या उमेदवारांसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांच्यासह उमेदवार यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वसामान्याचे प्रश्‍न सोडवावेत, ही भूमिका घेवून विकासाचा रथ राज्यामध्ये हाकण्यास सुरवात केली आहे. त्याच धर्तीवर राज्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकासाची कामे सुरु आहेत. नगरला उड्डाणपूल व्हावा, नगरचा पाणीप्रश्‍न सुटावा, रस्त्यांचा प्रश्‍न सुटावा, शहरात न्यायालयाची इमारत उभी राहावी यासाठी महापौर व पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी पाठपुरवा केला व तर शिवसेना लोकप्रतिनिधींनी विधानसभेत विषय मांडून शहरातील प्रश्‍न सोडवले आहेत, असे ही त्या म्हणाल्या.

यावेळी बोलताना दिलीप सातपुते म्हणाले की, आघाडीच्या काळत जी कामे झाली नाही ती शिवसेनेच्या काळात केडगावात मार्गी लागली आहेत. मोतीलाल नगरची टाकी, रस्त्याचा विकास आदीवर शिवसेनेने आपले लक्ष केंद्री केले आहे. विकासाच्या गप्पा मारणार्‍या खासदारांनी विकासाची गंगा कोठे नेऊन ठेवेली हे त्यानाच माहित नाही, तसेच आता मोठ मोठी आश्‍वासने भाजपवाले देत असून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. केडगावात मागे पडलेला विकासाचा दहा – पंधरा वर्षांचा बॅकलॉग या पाच वर्षात आम्ही भरुन काढला असल्याने शिवसेनेवर जनतेचा विश्‍वास असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका डबघाईला येणार होती मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जीएसटी लावल्यानंतर महानगरपालिकांना कटोरे घेवून उभे रहावे लागणार नाही अशी भूमिका घेतली व यातून महानगरपालिकेला प्रत्येक महिन्याला निधी उपलब्ध झाला. त्यामुळे आज अनेक महानगरपालिकांचा कारभार व्यवस्थित सुरु आहे, त्यात नगरचाही समावेश आहे.