डेंग्यूपाठोपाठ आता उंट अळीचा प्रादुर्भाव

45

सामना प्रतिनिधी । धुळे

शहरात डेंग्यूपाठोपाठ आता उंट अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शहराच्या चौफेर क्षेत्रात कडुलिंबाच्या झाडांवर उंट अळीचा प्रादुर्भाव आहे. ही अळी लिंबाची पाने खात आहे. त्यामुळे गडद छाया देणारी झाडे पिंजारलेल्या अवस्थेत दिसतात. उंटअळीमुळे शरीराला त्रास होतो, अशा तक्रारी अनेकांच्या आहेत. त्यामुळे नागरिक निंबाच्या झाडांची कत्तल करीत आहेत. असे असले तरी महापालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचा आरोप करत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरून आयुक्तांच्या दालनापर्यंत आंदोलक शनिवारी ढोल बडवत गेले.

धुळे शहरात मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी महापालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असताना शहरातील निंबाच्या झाडावर उंट अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रचंड मोठ्या संख्येने अळ्यांनी निंबाच्या झाडांना घेरले आहे. गडद छाया देणारे निंबाचे झाडे काही दिवसांतच पिंजारलेले दिसते. झाडावरील हिरवी पाने बेपत्ता झालेली दिसतात. तर पाने खाऊन खाली पडणाऱ्या आळ्यामुळे शरीराला उपद्रव होतो. या परिस्थितीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

उंट अळीच्या संदर्भात प्रशसनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सांगितल्या जात नाहीत. म्हणून नागरिकांनी थेट निंबाच्या झाडांची कत्तल करण्याचा मार्ग अनुसरला आहे. अनेक भागांमध्ये झाडांच्या कत्तली होत आहेत. एकीकडे ‘वृक्ष लावा वृक्ष वाढवा’ असा नारा देत लाखो रुपये खर्च होत आहेत. त्याचवेळी घनदाट असलेली झाडीची कत्तल होताना पाहायला मिळत आहे. महापालिका प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी भूमिका घेऊन गावकऱ्यांनी महापालिका सुस्त असल्याचा आरोप केला आहे.

सुस्तावस्थेत झोपलेल्या महापालिकेला आम्ही जागविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवेशद्वारापासून थेट आयुक्तांच्या दालनापर्यंत आम्ही ढोल बडवत पोहोचलो. या आंदोलनाची महापालिका प्रशासन लोकलज्जेस्तव दखल घेतील अशी अपेक्षा निलेश काटे यांनी व्यक्त केली. या आंदोलनात राजीव पाटील, रफीक शाह, पंकज चव्हाण, रिजवान अन्सारी, सलमान मिर्झा, वसीम सरदार, बानुबाई शिरसाठ, प्रभा परदेशी यांच्यासह अनेक जणांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या