कर्तृत्वाला सलामी

>>दिलीप जोशी <<

[email protected])

दक्षिण आफ्रिकेचे पहिले काळे भूमिपुत्र अध्यक्ष नेल्सन मंडेला. ते आणि त्यांच्या देशबांधवांना सुमारे दोन शतकं ‘गोऱ्या’ राजवटीच्या काळय़ा कारवायांनी हैराण केलं होतं. आफ्रिकेतून काळी माणसं गुलाम म्हणून अमेरिकेतही नेऊन विकली जात होती. माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य आपल्याकडच्या अस्पृश्यतेइतकेच भयानक होते.

सत्ता जेव्हा उन्मत्त होते तेव्हा तिला विरोध करणारे आवाज दाबले जातात किंवा क्षीण कसे केले जातात हे चीनचे नोबेल पुरस्कार विजेते आणि लोकशाहीवादी लेखक लिऊ क्षियाओबो यांच्यावर चीनमध्ये होणाऱ्या दडपशाहीतून आजही जगापुढे येत आहे. २०१० मध्ये त्यांना ‘नोबेल’ पारितोषिक मिळालं तेव्हा लाल चीनने त्यांना नॉर्वेला जायला नकार तर दिलाच, पण त्या देशाशी संबंधही तोडले. अर्थात चीन हा एकतंत्री राजवट मानणारा देश आहे. पण आफ्रिका आणि अमेरिकेत गेलेले ‘गोरे’ ब्रिटिश तर लोकशाहीची शेकडो वर्षांची परंपरा मिरवणारे होते. हिंदुस्थानातही ‘वसाहतवाद’ आणि इंग्लंडमध्ये लोकशाही असं त्यांचं स्वार्थी राजकीय ‘तत्त्वज्ञान’ होतं. काळाच्या ओघात काही गोऱ्या राजवटी मूळ ब्रिटनपासून मुक्त झाल्या. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका वगैरे ठिकाणी गोऱ्यांचीच, पण स्वतंत्र राज्यं अस्तित्वात आली. मायदेश सोडून गेलेल्या गोऱ्यांनी ‘स्वातंत्र्य’ मिळवलं ते मात्र त्या-त्या ठिकाणच्या स्थानिकांचा पाडाव करून. अमेरिकाही याला अपवाद नाही. कालांतराने अब्राहम लिंकनसारख्या द्रष्टय़ा नेतृत्वाने अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करून काळे-गोरे हा भेद संपुष्टात आणला. ब्रिटनही याबाबत उदारमतवादी झाला. हिंदुस्थानात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून अस्पृश्यता नष्ट झाली. परंतु दक्षिण आफ्रिकेतल्या गोऱ्यांचा वर्णद्वेष विसावं शतक संपत आलं तरी मावळत नव्हता. तिथली बोथा यांची राजवट पक्की वर्णविद्वेषी होती.

या माणुसकीशून्य राजवटीविरुद्ध आफ्रिकेतल्या एका राजघराण्यातला तरुण हिंमतीने उभा राहिला. थेंबू नावाच्या आफ्रिकन राजकुटुंबात १८ जुलै १९१८ रोजी जन्मलेल्या नेल्सन यांनी गोऱ्या राजवटीच्या जुलूमशाहीविरुद्ध संघर्ष सुरू केला. तीच गोष्ट त्याच आफ्रिकेत हिंदुस्थानी लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात महात्मा गांधींनी केली होती. अहिंसक सत्याग्रहाची संकल्पना जगात सर्वप्रथम तेथेच रुजली.

तरुण वयात गोऱ्या राजवटीविरुद्ध लढताना शस्त्राचा वापर करण्यास हरकत नाही असं वाटणारे मंडेला पुढे अहिंसावादी झाले. शांततेच्या मार्गाने पण ठामपणे लढा कसा देता येतो नि जिंकताही येतो याचा वस्तुपाठ त्यांनी जगाला शिकवला. हिंदुस्थानच्या ब्रिटिश राजवटीतले काही लोक तरी सुज्ञ होते. शिवाय उपऱ्या गोऱ्यांची एकूण संख्या हिंदुस्थानात जेमतेम लाखभर होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषी गोऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आणि शिक्षण तसंच शस्त्र्ासज्जता यामध्ये मूलनिवासी काळे लोक काळाच्या मागे पडलेले असा विषम लढा होता.

नेल्सन मंडेलांनी जनजागृती केली. गोऱ्या वर्णद्वेषी सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली. परिणामी त्यांची रवानगी वारंवार तुरुंगात होऊ लागली. मंडेला यांची शेवटची कैद तब्बल २७ वर्षांची होती. त्यांचं सारं तारुण्य गजाआड भयाण एकांतवासात आणि मृत्यूच्या छायेत गेलं. एकदा जेलरने त्यांना कबरीसारखा खड्डा खणण्याची शिक्षा दिली. तेव्हा तो खड्डा आपल्यासाठीच तर नसेल ना? असंही तरुण मंडेलांना वाटून गेलं. परंतु ते डगमगले नाहीत. २७ वर्षांच्या कष्टमय कैदेत त्यांचे डोळे अधू झाले, शरीर आजारग्रस्त झालं. पण मनाची उमेद कायम होती. ‘वाढू दे कारागृहाच्या भिंतींची उंची किती, मन्मना नाही क्षिती। भिंतींच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनि, मुक्त तो रात्रंदिनी’ या काव्यमय पंक्ती मंडेला जगले. मृत्यूवर मात करून जगले आणि अखेरीस मृत्युंजय झाले.

गुलामगिरीची जाणीव झाल्यापासून पुढची ६७ वर्षे मंडेला यांनी मानवतेचे हक्क अबाधित राहावे यासाठी व्यतीत केली. दक्षिण आफ्रिकेवरचं जागतिक दडपण वाढत गेलं. हिंदुस्थानने मंडेला यांना सुरुवातीपासून पाठिंबा दिला होता. एकाकी पडलेल्या बोथा यांनी सत्ता सोडली. तिथे क्लार्क आले आणि राजकीयचक्र मंडेलांना अनुकूल अशी फिरू लागली. मंडेला तुरुंगातून सुटले. १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत प्रथमच मुक्त निवडणूक झाली आणि मंडेला पहिले काळे लोकनियुक्त अध्यक्ष झाले!

जगाच्या इतिहासातील हा अपूर्व क्षण होता. एका शांतिदूत योद्धय़ाची ही जीत होती. आपल्या शपथविधीसाठी त्यांनी आपल्याला तुरुंगात छळणाऱ्या जेलरलाही सन्मानाने बोलावलं होतं. खचून जाणं आणि विध्वंस करणं सोपं आहे पण शांततेच्या मार्गाने पुनरुत्थान घडवणारेच खरे ‘हीरो’ असतात असे मंडेला स्वानुभवाने म्हणत.

१९९४ ते ९९ अशी पाच वर्षं देशाचे अध्यक्षपद सांभाळून मंडेला यांनी स्वखुशीने सत्ता सोडली. ते जगभर शांततेचा संदेश देत दौरे करू लागले. आपल्या सरकारने त्यांचा ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान केला. १६ मार्च २००१ रोजी ‘इंटरनॅशनल गांधी पीस फाऊंडेशन’चा शांतता पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते हिंदुस्थानात आले. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी त्यांचे आदराने स्वागत केलं. ‘हिंदुस्थान ही गांधींची जन्मभूमी तर आफ्रिका ही दत्तकभूमी’ असल्याचं सांगून आपल्यावरचा शांततामय आंदोलनाचा प्रभाव मंडेला यांनी कथन केला. २०१३ मध्ये ९५ वर्षांचं प्रदीर्घ कष्टमय आणि यशस्वी जीवन संपवून मंडेला निवर्तले. त्यांच्या हयातीच २००९ पासून १८ जुलै हा आंतरराष्ट्रीय मंडेला दिवस साजरा करण्याचा ठराव ‘युनो’ने केला. जगात असा सन्मान लाभलेले मंडेला एकमेव व्यक्ती असतील!