नेपाळमध्ये विमानाची हेलिकॉप्टरला धडक तीन ठार


सामना ऑनलाईन। काठमांडू

नेपाळच्या एव्हरेस्ट प्रदेशातील लुकला विमानतळावर उड्डाण करताना धावपट्टीवरून घसरून उभ्या केलेल्या दोन हेलिकॉप्टर्सला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले. रविवारी झालेल्या या अपघातात सहवैमानिक आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

सुमित एयर कंपनीचे ट्विन ओट्टेर हे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीवरून घसरलेले हे विमान धावपट्टीपासून 38 ते 50 मीटर अंतरावर उभ्या केलेल्या दोन हेलिकॉप्टरना धडकले. या अपघातात सहवैमानिक एस. धुंगाणा आणि हेलिपॅडवर तैनात असलेले सहायक उपनिरीक्षक राम बहादूर खडका हे ठार झाले. या अपघातात जखमी झालेले सह उपनिरीक्षक रुद्र बहादूर यांना काठमांडू येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र ग्रॅण्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.