नोटांवर लिहिल्यास होणार दंड

सामना ऑनलाईन । काठमांडू

नोटांवर काहीही लिहिल्यास, नोटा फाडल्यास, जाळल्यास किंवा त्यावर रेषा ओढल्यासही तो गुन्हा ठरणार आहे. तसेच त्यासाठी दंडही ठोठावण्यात येणार आहे. नेपाळ सरकारने १८ ऑगस्टपासून हा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड अॅक्ट २००७ नुसार देशातील चलनी नोटा किंवा नाण्यांचे नुकसान केल्यास तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे, असे नेपाळ सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नेपाळमधील राष्ट्रीय बँकांच्या शाखांना नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली असून १८ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नव्या नियमामुळे चलनी नोटा वापरण्याचा कालवधी वाढणार आहे. त्यामुळे नोटाछपाईचा खर्च आणि इतर खर्चातही कपात होणार असल्याचे एनआरबीच्या नोट व्यवस्थापनाच्या प्रमुख लक्ष्मी प्रपान्ना निरौला यांनी सांगितले.

चलनी नोटांवर काहीही लिहिल्यास, त्यावर चित्र काढल्यास, त्यावर रेषा ओढल्यास किंवा नोटा दुमडून नोटांचे नुकसान केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. नेपाळमध्ये पहिल्यांदाच चलनी नोटांबाबत असा नियम जाहीर करण्यात आला आहे. याआधी केवळ बनावट नोटांबाबतचा कायदा तेथे होता. नेपाळमध्ये सध्या २८ हजार कोटींच्या चलनी नोटा असून त्यातील ३० टक्के नोटा त्यावर लिहिण्याने किंवा रेषा ओढल्याने खराब झाल्या आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये हा नवा कायदा करण्यात आला आहे.