सुट्टी संपली, माथेरानची राणी आजपासून पुन्हा रुळावर

1

सामना प्रतिनिधी । कर्जत

नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन पावसाळी सुट्टी संपवून आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. पावसाळ्यात दरडींचा धोका असल्याने चार महिने नेरळ माथेरान ही सेवा रेल्वे प्रशासनाकडून बंद ठेवण्यात येते. मात्र नवीन डबे न लावता ही सेवा जुन्याच डब्यांवर सुरू झाल्याने प्रवासी वर्गाचा हिरमोड झाला आहे. मात्र दरवर्षीचा मुहूर्त मात्र रेल्वे प्रशासनाने टाळला असून तीन दिवस उशिरा माथेरानची ट्रेन सुरु झाली आहे.

शतकी सेवा देण्याची परंपरा असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन ब्रिटिश काळापासून पावसाळ्यातील चार महिने बंद असते. घाट सेक्शन असलेल्या या 21 किलोमीटरच्या घाटमार्गात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याची शक्यता असते.त्यामुळे ब्रिटिशांनी घालून दिलेला शिरस्ता रेल्वे प्रशासनाने कायम ठेवला आहे. त्याप्रमाणे 15 जून 2018 रोजी मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा बंद करण्यात आली होती आणि दरवर्षी 16 ऑक्टोबर ला नेहमी ही गाडी चालू होण्याचा शिरस्ता आहे. मात्र रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती वेळेत पूर्ण न झाल्याने आणि रेल्वे रुळावर आलेली झाडे तोडण्यासाठी फॉरेस्ट विभागाची परवानगी मिळत नसल्याने ही ट्रेन सुरु होण्यास तीन दिवस उशीर झाल्याचे बोलले जात आहे. मा

दरम्यान पावसाळ्यात मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे दुरुस्त करण्याची तसेच अन्य कामे करण्यात आली होती. मधल्या काळात माथेरानची राणी नवीन रूपात धावणार अशी घोषणा आणि तयारी रेल्वे प्रशासनाने केली होती मात्र या नवीन डब्यांना घेऊन जाणारी इंजिन सुस्थित नसल्याने जुनेच डबे लावून गाडी चालू करण्यात आली. रोज नेरळ-माथेरान अशा दोन फेरी होणार असून सकाळी 6.40 आणि 9.00 वाजता नेरळ येथून ट्रेन सुटणार तर संध्यकाळी माथेरान येथून 14.20 आणि 15.40 या नियमित वेळेत ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकारी यांनी दिली आहे.