दुर्गम खरबा वाडीला नेरळ प्रवासी संघटनेच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा

4

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या खरबाच्या वाडीतील ग्रामस्थांकरीता नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याच्या झळा आणि पाणी टंचाईचे चटके कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात तीव्र होताना दिसतात. असाच दुर्गम भाग असलेल्या परिसरातील खरबाच्या वाडीतील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. विहिरीत पाण्याचा थेंब नसल्याने महिलांच्या डोळ्यात पाणी दाटून येत असल्याचे चित्र आहे. खरबाच्या वाडीतील ग्रामस्थांची ही व्यथा पाहून नेरळ रेल्वे प्रवासी संघटनांनी त्यांना मदतीचा हात देऊन त्यांची तहान भागवली आहे.

कर्जत तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणूनही ओळखला जातो. कारण तालुक्यात दुर्गम आणि ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे चटके या भागाला सहन करावे लागतात. सरत्या उन्हाळ्याबरोबर पाणी टंचाईचे चटके अतितीव्र होत असल्याने अनेक गावे व वाड्यात पाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. खरबाच्या वाडीतील विहिरीत आता पाण्याचा थेंबही उरला नाही. वाडीतील या परिस्थिती मुळे महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल वणवण करावी लागत आहे. त्यातच शासनाचे टँकर सुद्धा अजून सुरु झालेले नाहीत. यामुळे या वाडीसाठी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना मदतीला धावून आली आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने खरबाच्या वाडीतील विहिरीत टँकरने पाणी पुरवठा केला आहे. काही दिवसांसाठी पाणी समस्या सुटल्याने ग्रामस्थांनी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, उपाध्यक्ष आबासाहेब पवार, सचिव राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष तरे यांचे आभार मानले आहेत. असे असले तरी शासनाचे टँकर सुरू कधी होणार हा प्रश्न अजूनही ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.