नेरुळ-उरण लोकल मार्चमध्ये धावणार

सामना प्रतिनिधी । न्हावा-शेवा

नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे खारकोपरपर्यंतचा रेल्वे मार्ग येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावर येत्या मार्च महिन्यात लोकल धावणार आहे. सिडको प्रशासनाने या रेल्वे मार्गासाठी डिसेंबर २०१७ ची डेडलाईन ठेवली होती. मात्र काम विलंबाने झाल्याने ती पाळली गेली नाही.

नेरुळ-उरण या २७ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी सुमारे १७८२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यातील ६७ टक्के खर्चाचा वाटा सिडको तर ३३ टक्के वाटा रेल्वेकडून उचलण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील नेरुळ ते खारकोपरदरम्यान रेल्वे मार्ग टाकण्याचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे. आठ किलोमीटरच्या या पहिल्या टप्प्यात सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर ही रेल्वे स्थानके येत आहेत. येत्या मार्चपर्यंत या सर्व स्थानकांवरील कामे पूर्ण करण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे.

क्रॉसिंगचे काम पूर्ण
हार्बर रेल्वे मार्गावर नेरुळ ते बेलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान २२ ते २५ डिसेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या जेम्बो मेगाब्लॉकदरम्यान हार्बर मार्ग आणि नेरुळ-उरण मार्गाचे क्रॉसिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता फक्त रेल्वे स्थानके आणि विद्युतीकरणाचे काम बाकी राहिलेले आहे.

निविदा उशिरा निघाल्या
चार महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकांच्या कामाच्या निविदा काढल्यामुळे कामाला थोडासा उशीर झाला आहे. रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म, तिकीट घर, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था झाल्यानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी सांगितले.